मलकापूरात १९ वर्षीय युवकाची गळ्यावर ब्लेड मारून आत्महत्या


मलकापूर : आई-वडील दवाखान्यात  तसेच वयोवृद्ध आजोबा घराबाहेर बसलेले असताना १९ वर्षीय युवकाने गळ्यावर ब्लेड मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. येथील सालीपुऱ्यात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तो डिप्रेशनमध्ये होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. येथील सालीपुरा भागातील पोलिस वसाहतीतील तेजस महादेव सोनोने (वय १९) हा आई वडील व वयोवृद्ध आजी-आजोबा समवेत एका खोलीत राहत होता. तो येथील विज्ञान महाविद्यालयात बीएस्सी कॉम्प्युटरच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता. पायाच्या दुखापतीला गँगरीन झाले असल्यामुळे तेजसच्या वडिलांना ड्रेसिंग करण्यासाठी त्याची आई व आजी बुधवारी दुपारी १:३० वाजता उपजिल्हा रुग्णालयात गेल्या होत्या. त्यामुळे आजोबा समवेत तेजस घरीच होता. त्यात आजोबा घराबाहेर बसले होते. त्याने आधी स्वतःला खोलीत बंद करून घेतले. त्यानंतर व्हॉटस्अॅपवर मामेभावाला मेसेज केला. हातातील ब्लेडने स्वतःच्या गळ्यावर वार केले. क्षणातच तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला व त्याचा जागीच मृत्यू झाला.

 तेजसच्या मामेभावाने त्याला आलेली माहिती वडिलांना दिली. त्यांनी तत्काळ लगेचच घराकडे धाव घेतली. तेजस घरात आढळून आला नाही. आजूबाजूला तो दिसेनासा झाला त्यावेळी शेजारी दाखल झाले. तेवढ्यात घराचा बंद दरवाजा उघडण्यात आला असता रक्ताच्या थारोळ्यात तेजस मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले.या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक करुणाशील तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. आत्महत्येसाठी वापरण्यात आलेले ब्लेड व मोबाइल ताब्यात घेण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहेत.

                    आत्महत्येपूर्वी मामेभावाला व्हॉटस्अॅपवर मेसेज

आत्महत्येपूर्वी तेजसने मामेभावाला व्हॉटस्अॅपवर मेसेज केल्याचे उघड झाले आहे. तेजस विज्ञान महाविद्यालयात बीएस्सी कॉम्प्युटरच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता. त्याच्या मृत्यूचे कारण सध्या तरी अस्पष्ट आहे. त्याने आत्महत्येपूर्वी मामेभावाला व्हॉटस्अॅपवर मेसेज करून कळविले आहे. या घटनेमुळे युवा वर्गाला जबर हादरा बसला आहे