पब सील, पाच जणांवर गुन्हा दाखल, दोन पोलिस निलंबित
पुणे : एफसी रोडवरील एका पबच्या स्वच्छतागृहात काही युवक अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर रविवारी व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. पोलिसांनी 'द लिक्विड लिझर लाउज' (एल ३) हा पब सील केला. रवी माहेश्वरी, उत्कर्ष देशमाने, योगेंद्र गिरासे, व्यवस्थापक मानस मलिक यांच्यासह इव्हेंट ऑर्गनायझर अक्षय दत्तात्रय कामठे या ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
ड्रग्ज पुरवठा कोण करतेय?
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोन मुले चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे एका पॅडवर ड्रग्ज टाकून एटीएम कार्डने ओढताना दिसत आहेत. एमडी प्रकारातील हे ड्रग्ज असल्याचेदेखील प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
पबचे मुख्य प्रवेशद्वार एक ते दीडच्या सुमारास बंद केले. मात्र, या पबमध्ये ये-जा करण्यासाठी मागूनदेखील दरवाजा असल्याने तेथून पार्टी करणारे युवक येत-जात होते, अशी माहिती सीसीटीव्ही फुटेजमधून मिळाली.
मालक वेगळाच, चालवायला दिला दुसऱ्यांना
'एल ३' पब संतोष आणि सचिन विठ्ठल कामठे या भावांच्या मालकीचा आहे. त्यांनी हा पब रवी माहेश्वरी, उत्कर्ष देशमाने आणि योगेंद्र गिरासे यांना भाडेतत्त्वावर दिला आहे. शनिवारी (दि. २२) पहाटे पाचपर्यंत ५० ते ६० जणांची पार्टी सुरू होती, अशी माहिती पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी दिली.