मुंबई : पवई येथे १५ वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी तटरक्षक दलात कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना अटक केली. घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास पीडित मुलगी व तिच्या वडिलांना आरोपींनी ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात सामूहिक अत्याचार, धमकावणे व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी विद्यार्थिनी आहे. पीडित मुलीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी सामूहिक अत्याचार, धमकावणे व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, १७ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सव होता. त्यावेळी घरातील सर्व मंडळी बाहेर गेली होती. आरोपीची पत्नीही नवरात्रोत्सवानिमित्त बाहेर गेली होती. आरोपीने त्यावेळी पीडित मुलीला त्याच्या पत्नीने बोलवले असल्याचे सांगितले. ती आरोपीच्या घरी गेली असता आरोपी व त्याच्या साथीदाराने पीडित मुलीचे तोंड दाबून तिला धमकावले. त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण पीडित मुलीने त्यांना विरोध केला. त्याचवेळी आरोपीच्या पत्नीचा दूरध्वनी आला. आपण घरी येत असल्याचे पत्नीने सांगितल्यावर आरोपी घाबरला व त्याने पीडित मुलीला सोडले.
हा प्रकार कोणालाही सांगितल्यास पीडित मुलीला व तिच्या वडिलांना ठार मारण्याची धमकी त्यांनी दिली. त्यामुळे पीडित मुलगी घाबरली होती. तिने डिसेंबर महिन्यात हा प्रकार आईला सांगितला. आईने वडिलांना हा प्रकार सांगितल्यावर त्यांनी तटरक्षक दलाकडे याप्रकरणी तक्रार केली होती. त्याप्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते.नुकतीच पीडित मुलीने पुन्हा याप्रकरणी ई-मेल पाठवून तक्रार केली होती. तसेच पीडित मुलीने पवई पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली. त्यानंतर तत्काळ बुधवारी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. दोघेही तटरक्षक दलात कार्यरत आहेत. एक आरोपी ३० वर्षांचा, तर दुसरा २३ वर्षांचा आहे.