अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी रोडवर टेम्पो अडवून लुटणाऱ्या तिघा आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले. आरोपींकडून ५० हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. सत्यवान दादा जाधव (वय २२), गौरव महादेव नाळे (वय २३), शुभम सुदाम क्षीरसागर (सर्व रा. अजनुज, ता. श्रीगोंदा) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टा येथील नीलेश नामदेव जाधव हे मंगळवारी (दि. ३०) टेम्पो घेऊन जात होते. त्यावेळी पाठीमागून मोटारसायकलवरून सहा जण आले. त्यांनी मोटारसायकल आडवी उभी करून टेम्पो अडविला. तलवारीचा धाक दाखवून जाधव यांच्याकडील एक लाख ५४ हजार रुपये घेऊन आरोपी पसार झाले. त्यांनी श्रीगोंदा तालुक्यात फिर्याद दिली या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने तपास हाती घेतला. तांत्रिक विश्लेषणात वरील आरोपींची नावे पुढे आली. हे आरोपी हे त्यांच्याच गावात अजनूज येथे फिरत आहेत, अशी गोपनीय माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी अजनुज गावात जाऊन सापळा रचला. त्यात वरील आरोपी अलगद अडकले ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात, बबन मखरे, रवींद्र कर्डिले, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग, गोकूळ इंगवले आदींच्या पथकाने केली.