पळालेल्या महिलेला गुन्हे शाखेने पकडले; साठ सीसीटिव्ही चित्रिकरणांचा तपास


 मुंबई : जबरी गुन्ह्यांत अटक झाल्यानंतर पलायन केलेल्या २० वर्षीय महिलेला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपी महिलेविरोधात साकीनाका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. त्याप्रकरणी अटक झाल्यानंतर १ फेब्रुवारीला आरोपी महिलेने पलायन केले होते. याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शगुन दिलीप यादव उर्फ राणी असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी महिला पोलिसांचा समेमिरा चुकवण्यासाठी मोबाईल फोन वापरत नव्हती. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तिच्या नातेवाईकांची कसून चौकशी केली. यावेळी साकीनाका पोलिसांच्या ताब्यातून पळाल्यानंतर कोठे गेली, याचा तपास करण्यासाठी घाटकोपर, विद्याविहार, शीव, दादर रेल्वे स्थानक परिसरांतील सुमारे ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासण्यात आले. ती महिला पळून गेल्यानंतर शेवटची दादर रेल्वे येथे उतरल्याची सिसीटीव्ही चित्रीकरणातून स्पष्ट झाले. अखेर गुन्हे शाखेच्या कक्ष १० च्या पोलिसांनी दादर, परळ, हिंदमाता या परिसरात महिलेचा शोध घेतला. अखेर परळ येथील टाटा रुग्णालयाजवळ तिला रविवारी ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाईसाठी तिला साकीनाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे गुन्हे शाखेतील अधिकाऱ्याने सांगितले.