आरक्षण प्रश्नावर धनगर समाजाची १७ पासून चोंडी ते मुंबई पदयात्रा

 


      मुंबईत बेमुदत उपोषण : अडीच महिने होऊनही कार्यवाही नाहीच

जवळा : धनगर आरक्षणप्रश्नी यशवंत सेनेतर्फे १७ फेब्रुवारी रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चोंडी (ता. जामखेड) ते मुंबई, अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे. २२ फेब्रुवारीला मुंबईत आझाद मैदानावर धनगर आरक्षणप्रश्नी बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी दिली. २० फेब्रुवारीला अभ्यासगटाच्या स्थापनेला तीन महिने पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. यशवंत सेनेतर्फे या आरक्षणप्रश्नी चोंडीत सप्टेंबर महिन्यात २१ दिवसांचे उपोषण केले होते.

त्यावेळी धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी ५० दिवसांचा वेळ राज्य सरकारने मागितला होता. मंत्री गिरीश महाजन यांनी चोंडी येथे प्रत्यक्ष येऊन उपोषण मागे घेतले होते. मात्र, पुढील ५० दिवसात काहीही कार्यवाही न झाल्याने यशवंत सेनेतर्फे चोंडी येथे पुन्हा उपोषण करण्यात आले. त्यावेळी आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी अभ्यासगटाची स्थापना केली.

यामध्ये पाच उच्चपदस्य शासकीय अधिकारी व चार अशासकीय सदस्यांचा समावेश केला. बिहार, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या तीन राज्यांत अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीचा अभ्यास करून किमान तीन महिन्यात राज्य सरकारला अहवाल सादर करण्याबाबत राज्य सरकारने स्वतंत्र परिपत्रक काढले. मात्र, अडीच महिन्यांनंतर अभ्यासगटाने केवळ मध्य प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांचा दौरा करून त्या राज्यांनी अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीचा अभ्यास केला आहे, असे दोडतले यांनी सांगितले.

राज्य सरकारच उदासीन

अद्याप हा अभ्यासगट तेलंगणाला गेलेला नाही. त्यामुळे हा अभ्यासगट तेलंगणाला जाणार कधी? माहिती घेऊन राज्य सरकारला अहवाल सादर करणार कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच लोकसभा निवडणूक आचारसंहिता साधारण महिन्याभरात लागण्याची शक्यता असल्याने धनगर आरक्षणप्रश्नी राज्य सरकार उदासीन असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी केला.