मुंबईः घरासमोर खेळणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी ५६ वर्षीय व्यक्तीला अंधेरी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. घडलेल्या प्रकारानंतर पीडित मुली घाबरल्या होत्या. त्यांनी हा प्रकार वर्ग शिक्षिकेला सांगितल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला.
पीडित मुली अनुक्रमे आठ व नऊ वर्षांच्या आहेत. त्या राहत्या घरातील परिसरात रविवारी खेळत होत्या. त्यावेळी आरोपीने पीडित मुलींसोबत अश्लील वर्तन केले. त्यामुळे पीडित मुली घाबरल्या. त्यांनी हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. अखेर पीडित मुलींपैकी एकीने तिच्या वर्ग शिक्षिकेला हा प्रकार सांगितला. ते ऐकून वर्ग शिक्षिकेने तत्काळ याबाबतची माहिती पीडित मुलीच्या आईला दिली. त्यावेळी मुलीच्या आईने विश्वासात घेऊन मुलीला विचारले असता झालेला प्रकार तिने सांगितला.
अखेर याप्रकरणी मंगळवारी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ विनयभंग व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून मंगळवारी मध्यरात्री ५६ वर्षीय आरोपीला अटक केली.