पश्चिम रेल्वे आरपीएफकडून ८५० मुलांची घरच्यांशी भेट


 मुंबई : पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ), रेल्वे पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांद्वारे ”ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत मुलांना वाचवून त्यांना त्यांच्या घरी परत पाठवले जाते. याद्वारे जानेवारी ते डिसेंबर २०२३ या एका वर्षात पश्चिम रेल्वेच्या सहा विभागातील हरवलेल्या ८५० मुलांची घरवापसी केली आहे. यामध्ये ५०८ मुले आणि २७९ मुलींचा समावेश आहे. यात मुंबई विभागातून सर्वाधिक म्हणजे ३१३ मुलांची सुटका केली आहे.आरपीएफद्वारे रेल्वेच्या मालमत्तेचे संरक्षण करणे, प्रवाशांची व त्यांच्या सामानाची सुरक्षा करणे अशी कामे केली जातात. यासह महिला, मुलांची तस्करी रोखण्यासाठी आरपीएफ सदैव जागरुक राहते. तसेच स्थानकात हरवलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांची कुटुंबियांशी भेट घडवून आणण्याची मोहीम सुरू आहे. गेल्यावर्षी, २०२३ वर्षात ८५० मुलांची आरपीएफ जवानांनी सुटका केली. त्यातील मुंबई सेंट्रल विभागात ३१३, वडोदरा विभागात ७४, अहमदाबाद विभागात १२५, रतलाम विभागात १८८, राजकोट विभागात १२१ आणि भावनगर विभागात ३५ मुलांची सुटका करण्यात आली.

रेल्वे स्थानकात विना पालक किंवा घाबरलेली मुले दिसल्यास, प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी अशा मुलांना विश्वासात घेऊन, त्यांची विचारपूस करतात. आरपीएफ कर्मचारी मुलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतात. त्यानुसार त्यांना नामांकित स्वयंसेवी संस्थेकडे सुपूर्द केले जाते. त्यानंतर त्याची समजूत घालून त्यांच्या पालकांशी पुन्हा भेट घडवून आणली जाते, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. मानवी तस्करी रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेवर ७७ ”अँटी ट्रॅफिकिंग युनिट्स”ची निर्मिती केली आहे. याशिवाय राज्य आणि केंद्रातील संबंधित अधिकाऱ्यांच्या सर्व विभागांमध्ये नियमित बैठका घेतल्या जात आहेत. रेल्वेने लहान मुलांच्या तस्करी रोखण्यासाठी ”बचपन बचाओ” मोहीम सुरू केली आहे. त्याचबरोबर नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी रेल्वेच्या डब्यांमध्ये मानवी तस्करी रोखण्याबाबत फलक लावले आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.