तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव रुग्णालयात

 


तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव हे त्यांच्या फार्महाऊसवर पाय घसरुन पडल्याने त्यांना सोमाजीगुडा येथील यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुरुवारी रात्री उशिरा इरावल्ली येथील त्यांच्या फार्महाऊसमध्ये ते पाय घसरुन पडले. त्यामुळे केसीआर यांच्या कंबरेला मार बसला आहे. केसीआर यांची प्रकृती सध्या स्थिर आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

आज त्यांच्या काही चाचण्या केल्या जाणार आहेत. त्यांना हिप फ्रॅक्चर झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तसंच त्यांच्या डाव्या पायाला गंभीर इजा झाली आहे असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर हे गुरुवारी त्यांच्या फार्महाऊसवर गेले होते. तिथे बाथरुममध्ये गेले असता त्यांचा पाय घसरला आणि ते पडले. त्यामुळे त्यांच्या कंबरेचं हाड मोडलं आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर काही वेळातच रुग्णालयाने मेडिकल बुलेटीनही जारी केलं.

सध्याच्या घडीला केसीआर यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आणि पक्षाचे काही लोक आहेत. तेलंगणाच्या निवडणुकीचा निकाल रविवारी लागला. त्यात केसीआर यांच्या हातून तेलंगणाची सत्ता गेली आहे. रेवंथ रेड्डी यांचा शपथविधी गुरुवारीच पार पडला. केसीआर हे त्यांच्या फार्महाऊसवर गेले असता ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. २०१३ मध्ये ते मुख्यमंत्री झाले त्यानंतरही मुख्यमंत्री होते. यावेळी मुख्यमंत्री होण्याची त्यांची हॅट् ट्रीक चुकली.

केसीआर यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. डॉ. कलवकुंतला संजय हे अस्थिरोग तज्ञ (orthopedician) त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणार आहेत. बाथरुममध्ये पाय घसरुन पडल्याने केसीआर यांना हिप फ्रॅक्चर झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही X वर पोस्ट लिहित केसीआर यांना लवकर बरं वाटावं अशा सदिच्छा दिल्या आहेत.