जग्गू डॉन वर कारवाईसाठी पोलीस व शेतकऱ्यांची बैठक

 

कापसाच्या मोबदल्यात ७५ दलालांनी २८ कोटी रुपयाची रक्कम उचलल्याचे समोर !

    शेतकऱ्यांच्या कापसाच्या मोबदल्यात ७५ दलालांनी सुमारे २८ कोटी रुपयांची उचल केल्याचे वास्तव उघडकीस आले आहे. शहरातील विश्रामगृहाच्या आवारात मंगळवारी पोलिस व शेतकऱ्यांच्या संयुक्त बैठकीत ही माहिती पुढे आली. आकडे वाढण्याची शक्यता आहे. जग्गू डॉनवर पुढील कारवाईसाठी आवश्यक माहिती गोळा करण्यासाठी बैठकीत वंचित शेतकऱ्यांनी पैशासाठी एकच गदारोळ केला. कापूस खरेदी करून फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य आरोपी जगन रामचंद्र नारखेडे ऊर्फ जग्गू डॉन पोलिस कोठडीत आहे. अधिक कारवाईसाठी पोलिस व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक मंगळवारी पार पडली.

    या बैठकीत जग्गू डॉनच्या दलालांवरचर्चा करण्यात आली. या बैठकीत शेतकरी नेते अॅड. साहेबराव मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी देवराम गवळी, पोलिस निरीक्षक विलास पाटील, पिरिपाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे, रिपाइंचे नेते सु. मा. शिंदे, अॅड. दिलीप बगाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळाभाऊ पाटील, शिवाजी घुले, उपनिरीक्षक सुरेश रोकडे, अॅड. अभिजित घुले पाटील आदींसह असंख्य शेतकऱ्यांची उपस्थिती होती 


शेतकऱ्यांच्या व्यथा..!

  • काही पण करा पैसे काढून दया. 
  • तक्रार जग्गुच्या  दलालांच्या नावाने दयावी. 
  • कापूस खरेदी दलालाने केली.
  • कागदावर लिहून दिले पावती नाही. 
  • मालमत्ता जप्त केली; पण शेतकऱ्यांचं काय. 
  • आपलेच गद्दार निघाले त्याला काय म्हणायचे. 
  • आमचा कापूस तोंडी भावात खरेदी केला मग काय? 
  • दलाल कापूस खरेदी केल्याचं मान्य करीत नाही.
  •  शेतकऱ्यांना राजकीय आश्रय नाही.
  •  हवं तर निम्मी रक्कम दया; पण पैसे द्या


कारवाईसाठी समिती गठित...!

    कापूस खरेदी करून फसवणूक केल्याप्रकरणी अटकेतील मुख्य आरोपी जगन रामचंद्र नारखेडे ऊर्फ जग्गू डॉनवर कठोर कारवाईसाठी पोलिसांची विशेष समिती गठित करण्यात आली. पोलिस अधीक्षक सुनील कडासणे यांच्या आदेशानुसार पोलिस उपअधीक्षकांच्या नेतृत्वात सहा सदस्यीय समितीच्या वतीने येणाऱ्या काळात तपासकार्य संयुक्त विद्यमाने करण्यात येईल.


    जग्गू डॉनला जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी दिवस-रात्र एक केली. त्यामुळे तपास पारदर्शकपणेच होईल; पण त्याच्यावर कठोर कारवाईसाठी शेतकयांनी पुढे आले पाहिजे. तुम्ही एक मदतीचा हात पुढे करा, दुसरा हात पोलिसांचा नक्कीच पुढे येईल, काळजी करू नये. -विलास पाटील, पोलिस निरीक्षक, मलकापूर