खामगाव : खामगाव येथील वस्तू व सेवाकर कार्यालयात झालेली बदली रद्द करून त्याऐवजी सोयीच्या ठिकाणी प्रतिनियुक्ती मिळण्याच्या प्रस्तावाला शिफारस पत्र देण्यासाठी येथील राज्य कर उपायुक्ताने महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप पिडीत महिलेने केला असून या प्रकरणात अमरावती येथील गाडगेनगर पोलिस ठाण्यात अखेर १४ डिसेंबर २०२३ रोजी विनयभंगासह अॅट्रॉसिटीअंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पिडीत महिला कर्मचाऱ्याने गाडगे नगर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार आधीच्या ठिकाणावरून खामगाव येथे बदली झाली होती. मात्र,वैद्यकीय कारणास्तव खामगाव हे ठिकाण गैरसोयीचे असल्याने त्याठिकाणाऐवजी सोयीच्या ठिकाणी प्रतिनियुक्ती मिळण्यासाठीचा अर्ज नागपूर येथील वस्तू व सेवाकर विभागाच्या अपर राज्य कर आयुक्तांकडे केला होता. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्याने खामगाव येथील अधिकाऱ्याची शिफारस असेल, तर प्रतिनियुक्ती देता येईल, असे पिडीत महिलेस सांगितले होते. त्यानुसार पीडितेने खामगाव येथील राज्य कर उपायुक्त मारोतराव राठोड यांना प्रतिनियुक्तीसाठी शिफारस पत्र देण्याची विनंती केली.
त्याचा गैरफायदा घेत आरोपी अधिकाऱ्याने पीडित महिलेला लज्जास्पद बोलत तिच्या व्हॉट्सअॅपवर शरीरसुखाची मागणी करणारे मेसेज पाठविल्याचा आरोपही तक्रारीत केला आहे. हा प्रकार १८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत म्हटले, तसेच विविध संभाषणांमध्ये त्यांनी पीडितेचा विनयभंग केल्याचे स्क्रीनशॉट, रेकॉर्डिंगचे पुरावे तक्रारीसोबत देण्यात आले. त्यावरून अमरावती शहरातील गाडगेनगर पोलिसांनी आरोपी राज्यकर उपायुक्त मारोतराव राठोड यांच्यावर भादंविच्या कलम ३५४ अ, ३५४ ड, ५०९, तसेच अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ (१), डब्ल्यू-२ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.