मोताळा : बुलडाणा जिल्ह्याला हादरून सोडणारी एक घटना समोर आली आहे. अडीच वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न आरोपीने केला. पीडित बालिकेची तब्येत खालावली असून तिला पुढील उपचारांसाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.
बोराखेडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अडीच वर्षीय बालिकेला २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चॉकलेटचे आमिष देऊन त्याच गावातील सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणाने एका पडक्या घरात नेले व तिच्यावर अमानुष अत्याचार केला. तसेच तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यात बालिका बेशुद्ध झाली असता तिला मृत समजून आरोपीने तिथून पलायन केले. पीडित मुलगी दिसत नसल्याने घरचे शोधत होते. अशात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्या पडक्या घराजवळून एक व्यक्ती जात असताना त्याला घरातून आवाज आला म्हणून त्यांनी कड़ी उघडून आत पाहिले असता पीडित बालिका दिसून आली. तिच्या शरीरातून रक्तस्त्राव होत होता. तत्काळ तिला बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बोरखेडी ठाणेदार बळीराम गिते आपल्या पथकासह त्या गावात दाखल झाले व आरोपीची माहिती काढून त्यांनी तत्काळ हे कृत्य करणाऱ्या अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले. याप्रकरणी बोराखेडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.