मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच चिघळल्याचं पाहायला मिळत आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचं घर जमावाने पेटवून दिल्यानंतर यासंदर्भात राज्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अनेक ठिकाणी आमदार, मंत्र्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळेपर्यंत बेमुदत उपोषण चालूच ठेवल्यामुळे राज्य सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
मुंबईत मुंडन आंदोलन
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलकांनी मुंबईत मुंडन आंदोलन केलं.
मनोज जरांगे पाटलांची पत्रकार परिषद
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन करून त्यांची समजूत काढल्यानंतर आजपासून जरांगे पाटील यांनी पाणी प्राशन करण्यास सुरुवात केल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा झाल्यानंतर थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार असून त्यात आपली भूमिका मांडणार आहेत.
दुपारी मंत्रीमंडळ बैठक
मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी ठाम भूमिका घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दुपारी मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात ठोस भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.