बांगलादेशी महिलांना देह विक्रीसाठी आणणाऱ्या टोळीला अटक

डोंबिवली- भारतात नोकरी मिळून देतो, असे आश्वासन देऊन सहा बांगलादेशी महिलांना डोंबिवली जवळील हेदुटणे गावात पाचजणांच्या टोळीने आणले. या महिलांना एका घरात कोंडून जबरदस्तीने देह विक्री करण्यास भाग पाडले. हा अनैतिक व्यवहार करून पैसे कमविणाऱ्या पाचजणांच्या टोळीला मानपाडा पोलिसांनी देह विक्री प्रतिबंधक विभागाच्या मदतीने गुरुवारी अटक केली.

युनुस राणा (४०), साहिल शेख (२६), फिरदोस सरदार (२४), आयुबअली शेख (३५), बिपलाॅप खान (२४) अशी आरोपींची नावे आहेत. यामधील एकजण भारतीय आहे. उर्वरित बांगलादेशचे रहिवासी आहेत. या टोळीकडून मानपाडा पोलिसांनी २५ आधारकार्ड, पॅनकार्ड, जातीचे दाखले, भारतीय चलनी नोटा जप्त केल्या आहेत. बांगलादेशमधील एका स्वयंसेवी संस्थेच्या महिलेने पुण्यातील फ्रिडम फर्म संस्थेच्या शिल्पा वानखेडे यांना संपर्क केला. बांगलादेशातील एका १९ वर्षांच्या तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून भारतामधील डोंबिवली जवळील हेदुटणे गावात नेले आहे. तेथे तिला एका खोलीत डांबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले जात आहेत, अशी माहिती दिली

वानखेडे यांनी मानपाडा पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसानी हेदुटणे गावातील विठ्ठल मंदिराजवळील एका खोलीत शुक्रवारी रात्री छापा टाकला. त्यावेळी पीडित महिला आणि तिच्यासोबत सहा महिला डांबून ठेवलेल्या आढळल्या. या महिलांना बांगलादेशमधून आरोपी युनुस राणा याने आणल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले. या महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास सांगून युनुस त्या माध्यमातून पैसे कमवित असल्याची माहिती पीडित महिलांनी पोलिसांना दिली.

युनुस आणि त्याचे साथीदार पलावा भागात राहतात अशी माहिती मिळाल्यावर पोलिसांनी गुरुवारी रात्री या भागात शोधमोहीम राबवली. पोलीस आपल्याला शोधत आहेत याची जाणीव झाल्यावर युनुस आणि त्याचे सहकारी अंतर्ली गावातील डोंगर भागात पळाले. पोलिसांनी जंगलात शोध मोहीम राबवून युनुससह त्याच्या साथीदारांना अटक केली. या आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापार, भारतात घुसखोरी, पारपत्र नियम उल्लंघन कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी भाड्याने सदनिका, खोली देताना त्याच्या ओळखपत्रांची माहिती घ्यावी. तो जेथे काम करत असेल तेथून त्याची माहिती घ्यावी. त्यानंतरच त्याला राहण्यास घर द्यावे, असे आवाहन मानपाडा पोलिसांनी केले.

साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश मदने, राम चोपडे, दत्तात्रय गुंड, साहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, सुनील तारमळे, प्रशांत आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.