कल्याणमध्ये एमडी तस्करी प्रकरणी दोन जणांसह नायजेरियन इसम अटक


    कल्याण– एमडी अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी डोंबिवली, कल्याण मधील स्थानिक दोन तरुणांसह नवी मुंबईतील जुहूगाव येथून एका नायजेरियन इसमाला अटक केली. या तस्करांकडून पोलिसांनी सुमारे सहा लाखाचे एमडी नावाचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. शुक्रवारी ही कारवाई पोलिसांनी केली.
या प्रकरणात डोंबिवलीतील नांदिवली बामणदेव भागातून सुनील श्रीनाथ यादव (२५), कल्याण पूर्वेतील चिंचपाडा भागातून युवराज योगेंद्र गुप्ता (३३) आणि नवी मुंबईतून चुकवुईइमेका जोसेफ (४२) यांना अटक केली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी शुक्रवारी गस्त घालत असताना म्हात्रे नाका साकेत महाविद्यालय परिसरातून यादव, गुप्ता यांना अटक केली होती. त्यांच्याकडून सहा ग्रॅम वजनाचा ३४ हजार रुपये किमतीचे एमडी जप्त करण्यात आले होते.

    या आरोपींच्या साक्षीतून ते ताब्यातील एमडी नवी मुंबईत राहत असलेल्या जोसेफ या नायजेरियन इसमाला विकणार असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी जोसफेला जुहूगाव येथून अटक केली. त्याच्याकडून पाच लाख ५८ हजाराचा एमडी साठा जप्त करण्यात आला. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी पोलिसांनी या तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. मागील १० दिवसात कोळसेवाडी पोलिसांनी गांजा तस्करी प्रकरणी १० इसमांच्या विरुध्द गुन्हा दाखल करुन त्यांच्याकडून ५० हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक अतुल लंबे यांच्या पथकाने ही कारवाई केली.