सासूकडून खंडणी वसूल करण्यासाठी मुलींच्या अपहरणाचा बनाव


 सासूच्या जंगम मालमत्तेतील दहा लाख रुपये घेण्यासाठी मुलींच्या अपहरणाचा बनाव रचून फोन करून खंडणी देण्यासाठी दबाव आणणाऱ्या वडिलाला वाकड पोलिसांनी अटक केली. सचिन मोहिते असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मोहितेची मेव्हणी सारिका कैलास ढसाळ (वय ३८ , रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सारिका ढसाळ यांची दोन वर्षांची मुलगी आणि मोहितेची १५ वर्षांची मुलगी मंगळवारी सायंकाळी दोघीजणी राखी खरेदी करण्यासाठी बाहेर आल्या होत्या. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या असल्याचे पोलिसांना कळले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पथके तयार करून मुलींचा शोध सुरू केला. 

पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली असता मोहितेही हजर होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आपण वाघोली येथून आलो असल्याचे सचिन याने जबाबात सांगितले. पोलिसांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता, सचिन हा मोटार दुरुस्तीसाठी घेऊन गेल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे सचिन याच्यावर पोलिसांना संशय बळावला.पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली असता सचिनच्या मोटारीमध्ये बसून दोन्ही मुली गेल्याचे दिसले. बुधवारी सकाळी पुन्हा पोलीस फिर्यादी यांच्या घरी गेले असता सचिन याच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, बहीण सारिका यांचा तीन महिन्यांपूर्वी मोबाईल हरवला होता. त्या नंबरवरून मोहितेला अपहरणकर्त्यांचा फोन आला होता.

 त्या फोनवरून अपहरणकर्त्यांनी ‘तुमच्या मुली सुखरूप पाहिजे असतील, तर पोलिसांना काही न सांगता दहा लाख रुपये द्या, नाहीतर तुमच्या मुलीचे बरेवाईट करेन’ अशी धमकी दिल्याची माहिती दिली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून मोहिते याचा या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न केले. त्यानुसार सचिनकडे कसून चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. सासू पुष्पा अल्हाट यांना भीती दाखवून त्यांच्या जंगम मालमत्तेपैकी दहा लाख रुपये मिळवण्यासाठी हा अपहरणाचा बनाव केल्याचे त्याने सांगितले. दोन्ही मुलींना वाघोली येथील घरी सुरक्षित ठेवले असून, त्या सकाळी दहा वाजता वाघोली येथून निघून मनपा भवन येथे येणार आहेत, असे त्याने सांगितले. 

त्यामुळे पोलिसांनी मनपा भवन येथे तीन पथके पाठवली. मात्र, प्रवासाला लागणाऱ्या वेळेपेक्षा जास्त वेळ झाला तरीही मुली मनपा भवन येथे पोहोचल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांना चिंता वाटू लागली. सचिन याने मुलींना ठेवलेल्या जागी जाऊन पोलिसांनी पाहणी केली असता तेथे मुली नव्हत्या. त्यानंतर पोलिसांनी पीएमपीएल प्रशासनाशी समन्वय साधत वाघोली ते मनपा भवन या दरम्यानच्या बसचालक व वाहकांना संपर्क करत मुलींची माहिती घेतली. त्यानंतर दुपारी दीड वाजताच्या सुमारास मुलींना बसमधून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सचिन मोहिते याला अटक केली आहे.