शिरपूरमध्ये पुन्हा गावठी बंदुकांसह संशयित ताब्यात



 धुळे: शिरपूर येथे पुन्हा दोन गावठी बंदुका आणि जिवंत काडतुससह संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयितांकडे गावठी बंदुका येतात कुठून, त्याचे मूळ शोधण्याची गरज व्यक्त होत आहे.राजेश बोरसे (२४, रा. सरस्वती कॉलनी, सेंधवा,मध्यप्रदेश) असे संशयिताचे नाव आहे. शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक ए. एस. आगरकर यांना संशयिताविषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शिरपूर बस स्थानक परिसरात सापळा लावला. बोरसे हा संशयितरित्या फिरताना दिसला. त्याची चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तरे न दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी त्याची तपासणी केली. त्याच्याकडे दोन गावठी बंदुका आणि एक जिवंत काडतूस आढळले.

पोलिसांनी बंदुका, काडतूस आणि भ्रमणध्वनी असा ६६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. बोरसेने गावठी बंदुका विक्री करण्याच्या उद्देशाने आणले होते, अशी प्राथमिक माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.