पिंपरी-चिंचवडमध्ये भरदिवसा फिल्मी स्टाईल गोळ्या झाडून हत्या!; आरोपी फरार


पिंपरी-चिंचवडमध्ये भर दिवसा एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना पाचच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे. फिल्मी स्टाईल घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे. एकाच मोटारीतून निघालेल्या व्यक्तींचे आपापसात झालेल्या वादातून सागर शिंदे याची गोळ्या झाडून हत्या केली. अद्याप नेमकं कारण समोर आलेलं नाही. यावर पोलिस देखील बोलण्यास टाळाटाळ करत आहेत. त्या वाहनाने काही गाड्यांना धडक दिली. औंध- रावेत बीआरटी मार्गावर असलेल्या रक्षक चौकाजवळ ही घटना घडली आहे.

भर दिवसा घडलेल्या घटनेमुळे भीतीच वातावरण काही काळ निर्माण झालं होतं. अज्ञात हल्लेखोरांचा शोध सांगवी पोलीस घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्यासह पोलिसांचा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला होता.मिळालेल्या माहितीनुसार, हत्या झालेला सागर शिंदे मोटारीतून त्याच्या काही साथीदारांसह जगताप डेअरी च्या दिशेने जात होते. दरम्यान, धावत्या मोटारीमध्येच सांगवी पुलावर त्यांच्यात वाद झाले. अशी माहिती सूत्रांनी दिली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण बिघडले. काही वाहनांना धडक देऊन गाडी तशीच पुढे गेली. रक्षक चौकाच्या जवळ जाताच गाडी पंक्चर झाली आणि या गाडीतून सागर शिंदे हा जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावायला लागला. तेव्हा, त्याच्या पाठीत अज्ञात व्यक्तीने गोळी झाडली. हा सर्व फिल्मी स्टाईल थरार भर दिवसा आणि वाहतूक असलेल्या रस्त्यावर घडला. सागर शिंदे हा रक्ताच्या थारोळ्यात त्याच ठिकाणी पडला.

आरोपी हे बीआरटी ओलांडून फरार झाले आहेत. त्यांचा शोध सांगवी पोलीस घेत असून घटनास्थळी पोलिसांचा फौज फाटा दाखल झाला. घटनास्थळी पिस्तुलातून झाडण्यात आलेल्या गोळ्यांच्या दोन पुंगळ्या मिळालेल्या आहेत. त्यामुळे सागर शिंदे याच्यावर गाडीत देखील गोळीबार झाल्याचं बोललं जातं आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा प्रकारे आरोपींकडे पिस्तूल येतात कुठून असा प्रश्न विचारला जात आहे. भर दिवसा घडलेल्या घटनेमुळे पिंपरी- चिंचवड शहरातील नागरिक सुरक्षित आहेत का? असाही प्रश्न उपस्थित होतो आहे.

हत्येच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार योगेश जगताप याला गुंड विरोधी पथकाने अवघ्या काही तासातच ताब्यात घेतलं आहे. हत्येच्या घटनेमुळे अवघ पिंपरी- चिंचवड शहर हादरले होते. अद्याप हत्येचं कारण समोर आलेलं नाही.