जैतखेडा येथील मनाला मोहीणी घालणारा ऋषीकुंड धबधबा ...पर्यटकांची गर्दी वाढली.



 प्रतिनिधी:- कार्तिक राजगुरु

20 ऑगस्ट 2023 कन्नड : डोंगराच्या कुशीत वसलेला कन्नड तालुक्यातील जैतखेडा येथील ऋषीकुंड परिसर श्रावणात भाविकांच्या गर्दीने महिनाभर फुललेला असतो.येथील तीन नद्यांचा संगम आणखी तुषार सिंचन करणारा धबधबा येथे पर्यटकांना आकर्षित केलेल्या शिवाय राहत नाही.येथील धबधबा सध्या ओसंडून वाहत आहे.

घनदाट जंगलात जैतखेड्यापासुन एक ते दिड किलोमीटर अंतरावर असलेले शेकडो वर्षांपुर्वी अनेक सांधु-संत-ऋषीमुनींनी साधना येथे केल्याने ऋषीकुंड नावाचे हे पुरातन स्थान प्रसिध्द आहे.त्रिवेणी संगमावर पाऱ्याकुंड नावाचा एक मोठा धबधबा असुन लागुनच फकिरकुंड व लेंडीकुंड आहे.या सर्वांचेच येणारे पाणी या ऋषीकुंडात येते.यंदा सर्वत्र पाऊस जोरदार हजेरी लावत असला तरी जैतखेडा परिसरात मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीला अल्प प्रमाणात पाऊस झाला मात्र जुलैच्या शेवटच्या आठवड्यात बऱ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे उशिरा का होईना तिन्ही कुंडातील पाण्याचा ओघ सुरू झाला.८०-९० फुट उंचावरून पाणी पडत असल्याने हा धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.

     श्रावण मासात प्रारंभ झाल्याने येथे भाविकांची गर्दी होत आहे.येणारे भाविक येथे डाळबट्टीचा (पानग्याचा) बेत आखून आप्तस्वकीय व मित्र परिवाराला आमंत्रित करतात.विशेष म्हणजे रानावनात जमा केलेल्या गोवऱ्यावर पानगे भाजुन जेवण दिले जाते.

या ऋषीकुंडात एक मोठी शिळा असुन त्या शिळेखाली मोठी बारव आहे.ती किती खोल आहे याचा मात्र अंदाज नसल्याचे जुनेजाणते सांगतात.मात्र ध्यान साधनेसाठी हे ठिकाण निवांत असल्याने हनुमान भक्त गोटीराम बाबा यांनी काही काळ येथे साधना केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

      ऋषीकुंडाला लागुनच मोठी कपार असुन त्या कपारीत रामभक्त हनुमानाची पुरातन अशी मुर्ती असुन बाजुलाच शिवलिंग आहे.श्रावण हा पवित्र महिना असल्याने शिवभक्त येथे शिवलिलामृत तसेच इतर धार्मिक ग्रंथांचे पारायण करतात.अत्यंत पुरातन स्थळ असल्याने दुरवरुन भाविक व पर्यटकांसह परिसरातील शाळेच्या सहली ही येथे मोठ्या प्रमाणात येतात.श्रध्देने तर कुणी पर्यटनस्थळ म्हणून या ऋषीकुंडाला निश्चितच भेट देतात.हे मात्र,तितकेच खरे.


                                जैतखेडा ते ऋषीकुंड रस्त्याची बिकट अवस्था

जैतखेडा ते ऋषीकुंड हा रस्ता अत्यंत खराब असुन भाविकांना चिखल तुडवत डोंगर दऱ्यातुन ऋषीकुंडाकडे जावे लागते.जाण्याचा रस्ता खडतर असल्यामुळे उतरतांना झाडांच्या मुळ्यांचा व फांद्यांचा आधार घेत उतरावे लागते. यामुळे घसरुन पडण्याची शक्यता असते.ऋषीकुंडात उतरण्यासाठी घाटांची ,संरक्षण कठड्यांची व माहिती फलक यांची आवश्यकता आहे.

      ऋषीकुंड पर्यटनस्थळ म्हणून म्हणुन घोषित झाल्यास परिसराचा विकास होईल, शासनाने या स्थळास पर्यटनस्थळ म्हणून घोषित करावे तर यांमुळे येथील पर्यटनाला वाव मिळेल, तसेच औरंगाबाद जिल्ह्यास नुकताच पर्यटन जिल्हा म्हणुन घोषीत केला आहे तरी यात ऋषीकुंडाचा समावेश व्हावा अशी आग्रहाची मागणी येथील ग्रामस्थांनी अनेक वेळा ठराव घेऊन संबंधित विभागाला दिलेली आहे.संबंधीत विभागाने या बाबतीत लक्ष घालून पावले उचलावीत अशी मागणी जोर धरत आहे.श्रावण महिन्यास प्रारंभ झाल्याने येथे दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत आहे.