पुणे : शहरात कोकेन, मेफेड्रोनची विक्री करणाऱ्या एका महिलेसह तिघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. मुंढवा भागात ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून ४६ लाख ५९ हजार रुपयांचे कोकेन, मेफेड्रोन जप्त करण्यात आले.
सागर कैलास भोसले (वय २६, रा. खराडी), अजितसिंग इंद्रजितसिंग भवानीया (वय ४०, रा. लोहगाव रस्ता), इम्ररीन गॅरी ग्रीन (वय ३७, रा. लोहगाव रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मुंढव्यातील लोणकर वस्ती भागात दोघेजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोध पथकाला मिळाली. पोलिसांनी भोसले आणि ग्रीन यांना पकडले. त्यांच्याकडून ४६ लाख ५९ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. चौकशीत दोघांनी भवानीया याच्याकडून अमली पदार्थ खरेदी केल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, विशाल दळवी, मारूती पारधी, मनोज साळुंके आदींनी ही कारवाई केली.