विदर्भात वीज कोसळून दहा मृत्युमुखी; चंद्रपुरातील आठ, तर वर्धा, गडचिरोलीत प्रत्येकी एकाचा समावेश

विदर्भात वीज कोसळून बुधवारी दहा जणांचा मृत्यू झाला. त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील आठ, तर वर्धा जिल्ह्यातील एका महिलेचा आणि गडचिरोली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा समावेश झाला. चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. ब्रम्हपुरीजवळील मौजा बेटाळा येथील गीता पुरुषोत्तम ढोंगे (४५) या दुपारी तीनच्या सुमारास शेतातून घरी परतत असताना वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. गोंडपिपरी तालुक्यातील चिवंडा येथे वनमजूर गोविंदा लिंगू टेकाम (५६) हे जंगलात वृक्षारोपणाचे काम करीत होते.

त्याचवेळी वीज कोसळून टेकाम यांनी प्राण गमावला. कोरपना तालुक्यातील चनई बु. येथे शेतात वीज कोसळून पुरुषोत्तम अशोक परचाके (२५) या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सिंदेवाही तालुक्यातीलदेलनवाडी येथे शेतात काम करताना वीज पडून कल्पना प्रकाश झोडे (४०) आणि अंजना रूपचंद पुस्तोडे (५०) या दोन महिला दगावल्या. पोंभूर्णा तालुक्यातील वेळवा गावात शेतात काम करताना वीज कोसळून अर्चना मोहन मडावी (२७) या महिलेचा मृत्यू झाला, तर खुशाल विनोद ठाकरे (३०), रेखा अरिवद सोनटक्के (४५), सुनंदा नरेंद्र इंगोले (४६), राधिका राहुल भंडारे (२०), वर्षां बिजा सोयाम (४०), रेखा ढेकलू कुळमेथे (४५) हे जखमी झाले.

गोंडपिपरी तालुक्यातील चेक विठ्ठलवाडा येथील योगिता खोब्रागडे (३५) आणि नागभीड तालुक्यातील सोनापूर येथील रंजन बल्लावार या दोन जणांचाही वीज कोसळल्याने मृत्यू झाला.वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील गिरड येथे शेतात वीज कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू तर पाच महिला जखमी झाल्या. सचिन भिसेकर यांच्या शेतात दुपारी तीन वाजता ही घटना घडली. दुर्गा ज्ञानेश्वर जांभुळे (४०) असे मृत महिलेचे नाव आहे. जखमी महिलांना समुद्रपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले.तत्पूर्वी, गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील महागाव येथे लक्ष्मण नानाजी रामटेके (५४) यांचा शेतात काम करीत असताना अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला.