प्रतिनिधी शंकर निंबारे
सामुहिक वनहक्क क्षेत्रातील डोंगर उतारावर श्रमदानातून करणार वृक्ष लागवड आणि जतन व संवर्धन...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवडोंगरी ग्रामपंचायतीमधील बोरमाळ- रानपाडा गावाची अंदाजे लोकसंख्या ३५० असुन येथील ग्रामस्थांनी सामुहिक वनहक्क क्षेत्रात जंगल जिवीका अध्यायन (संसाधन अभ्यास) आणि वनसंवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. बोरमाळ आणि रानपाडा हे दोन पाडे असून एकच ग्रामसभा आहे. ग्रामपंचायती सबंधी उपबंध (अनुसूचित क्षेत्रात विस्तारित करणे) अधिनियम १९९६ कलम ४ (ख,ग) व महाराष्ट्र नियम २०१४ अधिसुचनेप्रमाणे २०१७ ला पेसा ग्रामसभा घोषित झाली आहे.
बोरमाळ- रानपाडा (दि.२४) ग्रामस्थांनी माराचा दाता, बालघोलीच्य डोंगर उतारावर बोरमाळ ग्रामस्थांनी १०००, रानपाडा ग्रामस्थांनी १००० एकुण दोन हजार खड्डे खोदले असून पाऊस सुरू झाल्यावर श्रमदानातून वृक्ष लागवड करण्यात येईल असे सामुहिक वनहक्क व्यावस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश वळवी, उपाध्यक्ष रविंद्र वळवी यांनी सांगितले. श्रमदानासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. वयम् चळवळ अंतर्गत दोन्ही गावांना जंगली रोपे देणार आहोत. असे संस्थेचे सहविश्वस्त दिपाली गोगटे यांनी ग्रामस्थांना माहिती दिली आहे.
बोरमाळ- रानपाडा ग्रामस्थांनी २०१८ ला गोलदरी येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरात सहभाग घेऊन पेसा कायदा, वनहक्क कायदा, रोजगार हमी कायदा तसेच ग्रामसभेला मिळालेले हक्क, अधिकार ग्रामस्थांनी जाणुन घेतले. नंतर पाड्यावर गावसभेला सुरवात झाली. वयम् चळवळीच्या कार्यकर्तेने गावाला अधुन मधून भेट देवुन ग्रामसभा सक्षम व्हावी म्हणून कायद्याचे महत्त्व पटवून दिले.
बोरमाळ- रानपाडा ग्रामस्थांनी दि.२१/८/२०२१ रोजी पहिली ग्रामसमा घेऊन सामुहिक वनहक्कदावा मागणी अर्ज नमुना तयार करून उपविभागीय समितीला जमा केला आणि पोच घेतली. नंतर सामुहिक वनहक्क क्षेत्रातील संसाधन अभ्यासासाठी वनसंवर्धनासाठी प्रथम ग्रामसभेत एक वार जंगलवार बिया गोळा करण्यासाठी तसेच जंगल जिवीका अभ्यासाकरिता प्रकाश वळवी याची निसर्ग साथी निवड करून ठराव मंजूर केला. निसर्ग साथी प्रकाश वळवी याने संसाधन अभ्यासाचे प्रशिक्षण घेऊन गावाचा जीपीएस नकाशा, भुभागाची माहिती, स्थानिक हितसंबंधी गटांची माहिती, बाह्य हितसंबंधी गटांची माहिती, वनस्पती अभ्यास, रानभाजी अभ्यास, झाडांची माहिती, गौण वनौपज अभ्यास, जंगलातील फळांचा अभ्यास, माशांचा अभ्यास, पाणी अभ्यास, उपळा इत्यादी अभ्यास जानेवारी २०२२ ते नोव्हेंबर २०२२ पर्यंत पुर्ण केला. वयम् चळवळीने बोरमाळ- रानपाडा दोन्ही गावांचे संसाधन अभ्यास पुस्तक छपाई करून ग्रामस्थांना दिले आहे. नंतर ग्रामस्थांनी जंगलातील विविध प्रकारच्या बिया गोळा केल्या. महिला पुरषांनी बिया लगवडीचे कंटुर मार्किग प्रशिक्षण घेऊन सामुहिक वनहक्क क्षेत्रात पावसाळ्या अगोदर श्रमदानातून बिया लागवड केल्या नंतर आळे आणि भर घालणे इ. कामे २०२२ वर्षांत केले आहेत. गावाने हाती घेतलेले वनसंवर्धन, जंगल जिवीका अध्यायन प्रकल्पासाठी आणि जनजागृती कार्यक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन आणि आर्थिक सहकार्य वयम् चळवळ, लोकशाही जागर केंद्र जव्हार या संस्थेने केले.
वयम् चळवळ आणि ग्रामस्थांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे सामुहिक वनहक्क दावे मंजूर झाले. बोरमाळ १५७ हेक्टर- रानपाडा २५ हेक्टर असे सामुहिक वनहक्क पट्टे मिळाले असुन रानपाड्याच्या ग्रामस्थांनी वहिवाटीप्रमाणे वाढीव क्षेत्र मिळावे अशी मागणी केली आहे.