प्रतिनिधी सदाशिव काकडे
लातूर - लातूर जिल्ह्यात पंडित रेजितवाड या कर्तबगार पोलीस अधिकाऱ्याची चांगली ओळख निर्माण झाली आहे. पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी केलेल्या एकूण कामापेक्षा लाचलुचपत प्रतिबंधक विभागांतर्गत त्यांनी चालवलेली मोहीम आणि लातूर विभागांमध्ये लाचखोरांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाबद्दल निर्माण झालेला विश्वास याला पंडित रेजितवाड हे कारणीभूत आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
या विभागात कार्यरत झाल्यापासून त्यांनी अनेक लाचखोरांना धडा शिकविण्याचे कार्य केले आहे. एकापेक्षा एक धडाकेबाज मोहीम त्यांनी राबविली आहे. कर्मचारी-अधिकारी मग ते महसूल विभागाचे असो की पोलीस विभागाचे असो किंवा आणखी कोणत्याही विभागातील असोत, कोणाबद्दलही तमा न बाळगता कठोर कार्यवाही करण्याची पद्धत पंडित रेजितवाड यांची उल्लेखनीय आहे. लातूर विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील साध्या-भोळ्या माणसांना लुबाडण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात आहे. त्याला आळा घालण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग तत्परपणे काम करतो आहे.
निलंगा तालुक्यातील केळगाव सज्जाचे तलाठी भीमराव निलप्पा चव्हाण यांनी लाच स्वीकारल्याचा प्रकार घडला. तक्रारदार यांच्या पुतण्याच्या ताब्यात मौजे राठोडा, तालुका निलंगा या गावात 80 आर कुळाची जमीन आहे. त्या जमिनीच्या अनुषंगाने बक्षीस पत्राच्या आधारे विरोधी पार्टीने फेरफार नोंदवण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज केला होता. यातील तक्रारदार व त्याच्या पुतण्याने सदर अर्जावर आक्षेप नोंदविण्यासाठी तलाठ्याकडे तक्रार केली असता तक्रारदार त्यांच्या तक्रारीला तलाठी कार्यालयात ऑनलाईन नोंदवून तक्रारदाराच्या बाजूने अंतिम निर्णय देण्याच्या कामात मदत करण्यासाठी आरोपी लोकसेवक तलाठी भीमराव चव्हाण यांना तक्रारदार यांनी पंचा समक्ष सुरुवातीला सहा हजार रुपये लाचेची मागणी केली मात्र 6000 जास्त होतात म्हणून तक्रारदाराने तडजोड केली असता हा लाचेचा आकडा 3000 वर निश्चित झाला. त्यानंतर थोड्यावेळाने तक्रारदार यांनी आरोपी लोकसेवक तलाठी चव्हाण यांच्या निलंगा येथील तलाठी कार्यालयात मागणी केलेली रक्कम तीन हजार रुपये देण्यासाठी गेले असता, तलाठी चव्हाण यांनी पंचा समक्ष रक्कम स्वतः स्वीकारली. आरोपीस लागलीच लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचेच्या रकमेसह जागेवरच रंगेहात पकडले आणि त्यांच्यावर निलंगा पोलीस स्टेशन येथे रीतसर गुन्हा नोंदवायला सुरुवात केली.
लातूर येथील लातूर प्रतिबंधक विभागांमध्ये तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते. तसेच त्याने केलेल्या तक्रारीची शहानिशा होतात लगेच सापळा लावून कार्यवाही देखील केली जाते हा मोठा विश्वास पंडित रेजितवाड यांनी निर्माण केला आहे. निलंगा येथील हा यशस्वी सापळा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लाचलुचपत विभाग, लातूर चे पोलीस उपाधीक्षक पंडित रेजितवाड यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली आणि त्यांच्या सहकारी टीमने हा सापळा रचून यशस्वी केला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली हे करत आहेत.
लातूर जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या वतीने कोणीही खाजगी व्यक्ती, दलाल, एजंट यांनी कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त इतर लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, लातूर दूरध्वनी क्रमांक 02382-242674 तसेच टोल फ्री क्रमांक १०६४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक पंडित रेजितवाड यांनी केले आहे.
ReplyForward |