येवला -पंकज गायकवाड
मुल जन्मल्यापासून त्याच्यावर संस्कार टाकण्याचे व त्याला शिक्षण देण्याचे काम कुटुंबात त्याची आई करत असते, म्हणून ती कौटुंबिक माता आहे .परंतु मूल जेव्हा शाळेत येते तेव्हा त्याच्यावर संस्कार टाकण्याबरोबरच शिक्षण देण्याचं काम शाळा करत असतात म्हणून शाळा या सामाजिक माता आहेत; असे प्रतिपादन न्याहारखेडे शाळेचे मुख्याध्यापक श्री शरद संसारे यांनी केले; निमित्त होते इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ .
प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षण घेण्यासाठी कोणत्या ना कोणत्या शाळेत जात असतो आणि ठराविक कालावधी झाल्यानंतर तो त्याचे शिक्षणही पूर्ण करतो. आपण ज्या शाळेत खेळलो ,बागडलो, कधी हसलो ,कधी रडलो, ती शाळा सोडत असताना प्रत्येकाला दुःख हे होतच असते; परंतु पुढच्या वाटा आपल्याला खुणावत असतात.. पंखात बळ भरून फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाश कवेत घेण्याचा प्रयत्न करतात, अशा वेळेस आपल्यावर संस्कार करणारे आपले माता- पिता तसेच आपली शाळा यांना न विसरता त्यांचे ऋणाईत राहून आपणही स्वतःचे तसेच शाळेचे नाव रोशन करावे असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होते. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनोगतातून शाळेचा पहिला दिवस आणि या शाळेत प्रवेश करताना तेव्हा वाटणारी भीती आणि आज शाळा सोडत असताना होणारे दुःख यांच्या दरम्यानचा प्रवास आपल्या ओघवत्या शैलीत मांडला. विद्यार्थ्यांतर्फे हर्षदा डुबे, आरती बागुल, वैष्णवी देवरे, समाधान गुंजाळ, प्रसाद देवरे,अमोल देवरे,विकास कांदळकर, फैयाज शेख, गायत्री खंडीझोड, कल्याणी मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.. शिक्षक श्री वाल्मीक नवले ,संतोष बेलदार, ललिता कुमावत यांनीही आपले अनुभव सांगितले.