जळगाव – जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकाचवेळी दोन मातांची प्रसूती झाल्यानंतर परिचारिकेकडून पालकांना दिलेल्या चुकीच्या निरोपामुळे गोंधळ उडाला होता. अखेर डीएनए चाचणी झाल्यानंतर मंगळवारी रात्री बहुप्रतीक्षित अहवाल प्राप्त झाला आणि नवजात शिशूंना मातांकडे सोपविण्यात आले. त्यामुळे दोन्ही माता भावूक झाल्या.
पाचोरा तालुक्यातील कासमपुरा येथील प्रवीण भिल यांच्या पत्नी प्रतिभा व भुसावळ तालुक्यातील टहाकळी येथील उमेश सोनवणे यांच्या पत्नी सुवर्णा यांना प्रसूतीसाठी २ मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. एकीला मुलगा व दुसरीला मुलगी झाली. मात्र, नवजात शिशू पालकांकडे सोपविताना निरोप देण्यात झालेल्या गोंधळामुळे त्यांची अदलाबदल झाली होती. प्रशिक्षणार्थी डॉक्टर व परिचारिकांकडून झालेली ही चूक नंतर उघड होताच प्रसूती कक्षात गोंधळ उडाला होता. दोन्ही नवजात शिशूंचे पालक व नातेवाइकांनी डॉक्टर व परिचारिकांना धारेवर धरले होते
जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रारही देण्यात आली होती. त्यानंतर डीएनए चाचणीचा निर्णय झाला होता. दोन्ही माता आणि नवजात शिशूंचे डीएनए नमुने घेऊन नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्याचा अहवाल मंगळवारी सायंकाळी रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाला. अनेक दिवसांपासून माता व नवजात शिशूंची झालेली ताटातूट पाहता प्रशासनाने तात्काळ बाळ मूळ मातांना सोपविण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी नरेंद्र दिवेकर व रुग्णालय प्रशासन यांच्या उपस्थितीत दोन्ही मातांना त्यांच्या नातेवाइकांसह रात्री बोलाविण्यात आले. प्रभारी अधिष्ठाता तथा स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जितेंद्र घुमरे यांनी डीएनए अहवाल वाचून दाखविला.
अहवालानुसार सुवर्णा सोनवणे यांना मुलगी, तर प्रतिभा भिल यांना मुलगाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दोन्ही मातांना त्यांचे बाळ सुपूर्द करण्यात आले. यावेळी दोन्ही मातांना आनंदाश्रू आले होते. याप्रसंगी उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, डॉ. संजय बनसोडे, डॉ. अतुल गाजरे, डॉ. मिताली गोलेच्छा, डॉ. शुभांगी चौधरी, डॉ. विनेश पावरा, डॉ. श्रद्धा राणे, डॉ. संजीवनी अनेराय, नवजात शिशू विभागाच्या परिचारिका पूजा आहुजा, स्त्रीरोग विभागाच्या कक्ष क्रमांक सहाच्या परिचारिका चारुशीला पाटील आदी उपस्थित होते.