'शासन आपल्या दारी' अभियानाचा शुभारंभ


प्रतिनिधी: शंकर माने

शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या 'शासन आपल्या दारी' अभियानाचा शुभारंभ आज मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते दौलतनगर-मरळी येथे मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी मोफत आरोग्य शिबीर आणि पं. दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आपली भूमिका मांडली. 

मा. ना. शंभूराज देसाई साहेब यावेळी म्हणाले की, शासकीय अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत. 'शासन आपल्या दारी' अभियानाच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकारी शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी जनतेच्या दारात जात आहेत. नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत, हे चित्र समाधान देणारे आहे. मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांमुळे हे शक्य झाले आहे. त्यांच्या खंबीर नेतृत्वाखाली राज्य सरकार जनसेवेसाठी अखंड कटिबद्ध आहे, अशी भावना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी मांडली. 

'शासन आपल्या दारी' अभियानाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील २५ हजार ६९९ पात्र लाभार्थींना आज शासनाच्या विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला. कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक न्याय, कृषी, महिला-बाल कल्याण, रोजगार यांसह १७ विभागाकडील योजनांचा लाभ पात्र लाभार्थींना देण्यात आला. महसूल व सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांचे वाटपही यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात करण्यात आले. या भियानाद्वारे तहसिल कार्यालय पाटणकडून १० हजार १५१ लाभार्थींना लाभ दिला जाणार आहे. तसेच पंचायत समिती पाटणकडून ९ हजार ३७१, वेल्फेअर बोर्ड साताराकडून १ हजार ५५१, तालुका कृषी अधिकारी पाटण यांच्याकडून १ हजार २९५ , तहसिल कार्यालय कराडकडून १ हजार २३२ यासह प्रांत कार्यालय पाटण, तालुका कृषी अधिकारी कराड, नगर पंचायत पाटण, महावितरण, वन विभाग, दुय्यम निबंधक, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, जिल्हा रुग्णालय कराड यांच्यामार्फत लाभार्थींना लाभ देण्यात आला. 


यावेळी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीत लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई आणि स्व. शिवाजीराव देसाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, फलोत्पादन मंत्री मा. संदीपानजी भुमरे, उद्योग मंत्री मा. उदय सामंत, आमदार श्रीमंत छत्रपती मा. शिवेंद्रराजेजी भोसले, मा. महेशजी शिंदे, मा. शहाजीबापू पाटील, मा. अनिलभाऊ बाबर, मा. प्रकाशजी आबीटकर, माजी आमदार मा. नरेंद्रजी पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.