प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणारे रयतेचे अधिपती म्हणजे छत्रपती शाहू महाराज:- बालाजी मुस्कावाड



उदगीर,

श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात कोल्हापूर संस्थानाचे अधिपती छत्रपती शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी वर्ष  साजरे करण्यात आले.यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के तर प्रमुख पाहुणे म्हणून योगगुरु रामचंद्र गरड, सांस्कृतिक विभाग प्रमुख बालाजी मुस्कावाड, धनराज काटू, संतोष चामले, विलास शिंदे, संजय निरणे, झेटिंग कांबळे हे उपस्थित होते.सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करुन करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बालाजी मुस्कावाड यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. 

ते म्हणाले, छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराजांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे योगगुरु रामचंद्र गरड आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक, कोल्हापूर संस्थानाचे अधिपती, समाजसुधारक म्हणून परिचयाचे आहेत. त्यांनी अस्पृश्यता निवारण, जातिभेद निर्मूलन यासाठी खूप प्रयत्न केले.अध्यक्षिय समारोपात कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के म्हणाले, छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने आपले विद्यालय आहे. त्यांच्या विचारांचा आपण सर्वांनी अवलंब करुन त्यांचे विचार विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चामले अरसनाळकर यांनी केले तर आभार प्रल्हाद येवरीकर यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनायक करेवाड, सुनील महिंद्रकर, बालाजी कांबळे, अमित आग्रे यांनी परिश्रम घेतले.