अनिकेत मशिदकर मालेगाव प्रतिनिधी
8 मे नाशिक: येथील तपोवन आणि मखमलाबादमध्ये मिळालेले ते १११ उंट चुंचाळेच्या श्री नाशिक पांजरपोळ पंचवटी ट्रस्टकडे सोपवण्यात आलेत. एका उंटामागे तीनशे रुपयांचा खर्च संस्था दिवसाला करत आहे. हिरवा चारा, उसाच्या बांड्या, शेंगदाणे, गूळ असे खाद्य रोज दिले जात आहे.
आजारी गायींसोबत उंटांना सांभाळण्याची तारेवरची कसरत संस्था करत आहे. उंटांसाठी एक जागा राखीव करून त्या ठिकाणी त्यांची काळजी घेतली जात आहे. कत्तलीसाठी तस्करीचा हा प्रकार प्राणीमित्र पुरुषोत्तम आव्हाड यांनी उघडकीस आणला. मोठ्या संख्येने उंट आले कसे? असा प्रश्न यानिमित्ताने प्राणीमित्र विचारू लागलेत.उंट राजस्थानमधून नेमके कोठून आणण्यात आले आणि ते कोठे नेण्यात येत आहेत, याची माहिती मिळत नाही. श्री नाशिक पांजरापोळ पंचवटी ट्रस्टने याबाबत अंबड पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. घटनेचा तपास आडगाव पोलिस ठाणे, महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालय असा संयुक्तपणे केला जात आहे.तस्करीसाठी नेले जाणारे ८२ उंट गुरुवारी (ता.४)रात्री तपोवनातून ताब्यात घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आजारी उंट चुंचाळेतील पांजरपोळ येथे हलवण्यात आले. मखमलाबाद परिसरातून २९ उंट ताब्यात घेण्यात आले. हेही उंट पांजरपोळमध्ये नेण्यात आलेत.पांजरपोळकडे सोपवण्यात आलेल्या पाच जखमी उंटांना सलाइन लावून उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक विठ्ठल आगळे यांनी दिली.
पशुवैद्यकीय विभागातील डॉ. सचिन वेंदे त्यासाठी सहकार्य करत आहेत. यानिमित्ताने राजस्थान सरकार हे उंट पुन्हा घेवून जाणार का? असा प्रश्न प्राणीमित्र उपस्थित करत आहेत. राजस्थानमधून उंटांची तस्करी होत असल्याची माहिती राजस्थानमधील एक सामाजिक संस्थेने महाराष्ट्राच्या राज्यपालांना नुकतीच कळवली. त्यानंतर दक्षतेचे पत्र राज्यपालांकडून पशुकल्याण विभाग व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांची बैठक घेतली."तस्करी साठी नेत असलेल्या उंटांना नवे जीवन मिळाले आहे. आता तस्करीखोरांवर गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे. इतक्या मोठ्या संख्येने उंट राजस्थानमधून आले कसे? याची देखील सखोल चौकशी होणे आवश्यक आहे." - पुरुषोत्तम आव्हाड, प्राणीमित्र"आमच्या संस्थेकडे आता एकशे अकरा उंट झाले आहेत. उंटांसाठी आम्ही उसाच्या बांड्या, शेंगदाणे आणि गूळ असे खाद्य देत आहोत. त्यांच्यावर औषधोपचार आम्ही करीत आहोत. त्यासाठी मोठा खर्च संस्था करीत आहे." -विठ्ठल आगळे, व्यवस्थापक, पांजरपोळ