सिन्नरच्या बसस्थानकात सतत होत आहे चोरी


अनिकेत मशिदकर मालेगाव प्रतिनिधी 

१९ मे सिन्नर: येथील बसस्थानकात एका प्रवाशाच्या बॅगमधून मोबाइल, दागिने व रोकड चोरीला गेल्याची घटना घडली तर एका महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने बसस्थानकातून लांबवले.

       सुभाष रामचंद्र ढाकणे (४०) रा. साईबाबानगर, सिन्नर हे गावी जाण्यासाठी दुपारी बसस्थानकात आले होते. यावेळी ते येथील बाकड्यावर बॅग ठेवून लघुशंका करण्यासाठी स्वच्छतागृहात गेले असता, अज्ञात चोरट्याने संधी साधत त्यांच्या बॅगमधील विवो कंपनीचा मोबाइल, काळ्या धाग्यात ओवलेले ओमपान व काही रोकड घेऊन लंपास झाला. ढाकणे लघुशंका करून पुन्हा बॅगेजवळ आले असता त्यांना बँगेतून मोबाइल व रोकड चोरीला गेल्याचे दिसून आले. आसपास विचारपूस करूनही काही तपास न लागल्याने त्यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात येत तक्रार दाखल केली आहे.

        तर दुसऱ्या घटनेत दापूर येथील खंडू रघुनाथ आव्हाड (७९) हे वृद्ध बसमध्ये चढत असताना चोरट्याने त्यांच्या पत्नी जिजा यांच्या पिशवीतून एक तोळ्याची पोत चोरून पोबारा केला. काहीवेळानंतर त्यांच्याही चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनीही तत्काळ सिन्नर पोलिस ठाण्यात येत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस नाईक चेतन मोरे व हवालदार पवार करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बसस्थानकात चोरीचे सत्र सुरू असल्याने प्रवाशांसह पोलिसांना डोकेदखी वाढली आहे.