अरुण पवार यांचे शैक्षणिक कार्य दीपस्तंभाप्रमाणे:- गटविकास अधिकारी अन्सार शेख



वार्ताहर:-पंकज गायकवाड

येवला तालुक्यातील अंगुलगाव शाळेचे पदवीधर शिक्षक अरुण जयवंतराव पवार हे आपल्या नियत वयोमानाप्रमाणे दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी आपल्या तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झालेत याप्रसंगी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात गटविकास अधिकारी श्री अन्सार शेख बोलत होते.

अरुण पवार सर यांनी नाशिक जिल्हा परिषद येथे ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे तीस वर्षे केले .हे काम करत असताना त्यांनी विद्यार्थी हेच आपले कुटुंब समजून विद्यार्थ्यांना वेळोवेळी आर्थिक व शैक्षणिक मदत केली. त्यांना हवे असलेले शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले; त्याचबरोबर आपण समाजाचे देणे लागतो याचे कृतज्ञतापूर्वक भान ठेवून समाजातील अनेकांना  वेळोवेळी मदत केली .आज २१ व्या शतकात समाजाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये अशा कर्मयोगी व्यक्तींची गरज असून त्यांचे कार्य हे संपूर्ण समाजासाठी आदर्शवत असे आहे असे गौरवोद्गार येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अन्सार शेख यांनी काढले. विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून श्री अरुण पवार सर यांनी इमाने इतबारे तीस वर्ष विद्यार्थी सेवेचे व्रत हाती घेतले होते. श्री पवार सर हे आज जरी सेवेतून निवृत्त झाले असले, तरी त्यांनी समाजाची सेवा करून आपले आदर्शवत जीवन यापुढे समाजासाठी खर्च करावे ,अशी अपेक्षा यावेळी श्री शेख यांनी व्यक्त केली.

 याप्रसंगी बोलताना शिक्षण विस्तार अधिकारी श्री सुनील मारवाडी सर यांनी सांगितले की पवार सर नेहमी प्रथम विद्यार्थ्यांना प्राधान्य देत असत त्यावरून विद्यार्थी त्यांच्या दृष्टीने किती महत्त्वाचे होते हे दिसून येते . सर्व शिक्षकांनी श्री अरुण पवार यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करावे अशी अपेक्षाही व्यक्त केली . येवला पंचायत समितीचे माजी सभापती श्री प्रवीण भाऊ गायकवाड यांनी यावेळी संपूर्ण अंगुलगाव टीमचे तोंड भरून कौतुक करताना सांगितले की ;पवार सरांसोबत असलेले सर्वच शिक्षक अतिशय मेहनती असून त्यांच्यामुळे आज अंगुलगाव शाळा ही नाशिक जिल्ह्यामध्ये एक मॉडेल स्कूल म्हणून उदयास आलेली आहे. पवार सर अंगुलगाव शाळेत आल्यापासून दरवर्षी सातत्याने त्यांचे विद्यार्थी नवोदय परीक्षेत उत्तीर्ण होत होते .त्यांचे विद्यार्थी आज उच्च पदावर काम करीत असून भविष्यात यातीलच एखादा विद्यार्थी क्लासवन अधिकारी झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. अशा प्रकारचे शैक्षणिक कार्य पवार सर यांनी या अंगुलगाव शाळेत केलेले आहे. सायगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री शेळके सर यांनी आपल्या भाषणात सांगितले की  ,पवार सर यांच्या सेवानिवृत्तीमुळे अंगुलगावच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली असून ती पोकळी भरून येण्यासाठी सर्वच शिक्षकांना खूप मेहनत घ्यावी लागेल...

 या कार्यक्रमासाठी अंगुलगाव चे सरपंच भगवान जाधव ,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष, अंगुलगाव शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, अंगुलगाव चे मुख्याध्यापक श्री अरुण खरोटे, पदवीधर शिक्षक गोपीनाथ पवार, श्री विजय परदेशी, श्रीमती किशोरी नाकोड ,श्रीमती योगिता कुमावत त्याचप्रमाणे सायगाव केंद्रातील मुख्याध्यापक श्री रावसाहेब वैद्य, श्री शरद संसारे, श्रीमती प्रमिला घोलप, श्री अमर गावित, श्री विलास सानप ,श्री समाधान अहिरे, श्री समाधान शिंदे, श्री संतोष बेलदार, श्री ज्ञानेश्वर निकम, श्री निलेश वाघ ,श्री शरद काटमोरे ,श्री संतोष पठारे, श्री संतोष गावित, श्री नितीन गावित, श्री अमित कलगुंडे, श्री सुनील बागले, श्री भाऊसाहेब तांदळे आदींसह अंगुलगाव चे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.