उष्णतेच्या वाढत्या लाटेमुळे मनमाड आठवडी बाजारात शुकशुकाट


अनिकेत मशिदकर मालेगाव प्रतिनिधी 

     १५ मे मनमाड:  शहरात दर रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात वाढत्या तापमानाने शुकशुकाट दिसून आला. तापमान दररोज वाढत असल्याने, रविवारी (दि. १४) आठवडे बाजारातील, तसेच शहरातील बाजारपेठ आणि चौकाचौकातील वर्दळ कमी होऊन बाजार विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. 

     मनमाडला दर रविवारी आठवडे बाजार भरतो. मनमाडसह ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने विक्रेते बाजारासाठी येत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात तापमानात मोठी वाढ होत आहे. तापमान ४२ अंशांच्याही पुढे पोहोचल्याने रविवारी आठवडे बाजार असूनही

मनमाड येथील आठवडे बाजारात पसरलेला शुकशुकाट,

बाजारपेठेत नेहमीची वर्दळ दिसून आली नाही. दुकानदार, तसेच रस्त्यावरील विविध वस्तूंचे फेरीवाले भर उन्हात ग्राहकांची प्रतीक्षा करत होते.

       मनमाडसह नांदगाव, चांदवड आणि येवला या तीन तालुक्यांना मनमाडचा रविवारचा आठवडे बाजार हा मध्यवर्ती बाजार म्हणून गणला जातो. साप्ताहिक बाजारासाठी ग्राहक आणि विक्रेते मोठ्या संख्येने येत असतात, पण गेल्या आठवड्यापासून शहराच्या तापमानात रोज वाढ होत आहे. तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदविले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून नागरिकांनी आपल्या गावातच राहणे पसंत केल्याने शुकशुकाट दिसून आला. विशेषत दुपारनंतर अक्षरशः ग्राहकांची वर्दळ कमी झाली, त्यामुळे बाजारपेठ ओस पडली होती.

       सायंकाळी सहानंतर तापमान काही अंशी कमी झाल्यानंत बाजारात किराणामाल, धान्य भाजीपाला, फळे खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. शेती व्यवसायाची निगडित मजूर उन्हामुळे बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याने बाजारपेठेवर त्याचा परिणाम दिसून आला. प्रवासी व मालवाहतूक यांचा व्यवसाय मंदावल्याने रस्त्यावर वाहनांची नेहमीची वर्दळ दिसून आली नाही.