पतीच्या जाचाला कंटाळून विवाहितेचि गळफास घेऊन आत्महत्या

 


अंजनगावसुर्जी ■ येथील गणेशनगर येथील आई- वडिलांचे छत्र नसलेल्या विवाहितेने माहेरवरुन गाडी घेण्यासाठी पैसे आणण्याकरिता पतीद्वारा नेहमीच्या मारझोड व त्रासापायी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

अंजनगाव सुर्जी येथील शुभम रामेश्वर पानझडे (२६) रा. गणेशनगर याचा धनश्री हिच्यासोबत मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात रीती रिवाजाप्रमाणे लग्न केले. काही दिवस संसारगाडा सुरळीत चालल्यानंतर शुभम धनश्रीला रोज दारू पिऊन मारझोड करीत असे व तुझ्या भावाकडून गाडी घेण्यास पैसे घेऊन ये, नाहीतर मारून टाकीन असे तो नेहमी म्हणायचा. त्यामुळे त्यांच्यात दोघात नेहमीच खटके उडत होते, तरीसुद्धा आई वडिलाविना पोरकी असलेली धनश्री तिच्या माहेरच्या मंडळीला त्रास होईल, या कारणाने आपला संसाराचा गाडा चालवत होती. बरेच वेळा भांडण-तंट्यानंतर शुभमला धनश्रीचे भाऊ व बहीण व काका यांनी समजावण्याच्या प्रयत्न केला; परंतु शुभम ऐकत नसल्याने व तिला माहेरून पैसे आणण्याच्या कारणास्तव त्यांचे नेहमीच मानसिक त्रास देणे तथा मारझोड चालूच होते. अखेर धनश्रीने जाचापायी आपल्या राहत्या घरात २५ मे रोजी सकाळी नऊच्या सुमारास गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

मृतक धनश्रीचे पालनकर्ते तिचे काका ओमप्रकाश मारुती गाठेकर (६४) मु. पो. निंबा ता. मूर्तिजापूर यांना धनश्री गंभीर आजारी असल्याचा फोन मिळाल्यावर ते अंजनगाव येथे पोहचले असता त्यांना पुतणीचा मृतदेह पाहावयास मिळाल्यानंतर ओमप्रकाश गाठेकर यांनी धनश्रीच्या पतीविरोधात पोलिसस्टेशनला फिर्याद दिल्यावर, पोलिसांनी आरोपी शुभम पानझडे यास भादंवि ३०४, ३०६ (ब) प्रमाणे अटक केली. पुढील तपास ठाणेदार दिपक वानखडे यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी स.पो.नि.विना पांडे व पोहलस कर्मचारी करीत आहेत.