पुणे: अमली पदार्थ तस्करांकडून साडेनऊ लाख रुपयांचे ३५ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. संगम पूल तसेच बोपोडी भागात अमली पदार्थ विरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.समीउल्ला सलीम शेख (वय २७, रा. पठाण चाळ, बोपोडी), जिंतू सुंदर नायडू (वय ३३, रा. अगरवाल चाळ, बोपोडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शहरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तस्करांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ संगम पूल परिसरात एक जण अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून समीउल्ला शेखला पकडले. त्याच्याकडून दुचाकी, एक लाख ८० हजार रुपयांचे ९ ग्रॅम मेफेड्रोन, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बोपोडी भागातील मिलिंदनगर परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करुन जिंतू नायडूला पकडले. त्याच्याकडून पाच लाख २४ हजार रुपयांचे २६ ग्रॅम २ मिलीग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. आरोपी शेख आणि नायडू ओळखीचे आहेत. दोघांनी मुंबईहून मेफेड्रोन विक्रीसाठी आणल्याची माहिती तपासात मिळाली आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, विशाल शिंदे, योगेश मोहिते, मनोजकुमार साळुंखे, मारुती पारधी, विशाल दळवी आदींनी ही कारवाई केली.