मुंबई पोलिसांना ट्विटरच्या माध्यमातून मुंबईत बॉम्बस्फोट करण्याबाबतची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या ट्विटवर सोमवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास एका अकाऊटवरून ‘i m gonna blast the mumbai very soon’ असा इंग्रजी भाषेत धमकीचा मेसेज पाठवण्यात आला होता. ‘मी लवकरच मुंबईमध्ये बॉम्बस्फोट करणार आहे.’, अशाप्रकारचा हा मेसेज आला आहे.
या धमकीच्या मेसेजची गंभीर दखल घेत पोलिसांनी संबधित अकऊंटची तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. मुंबईत बॉम्बस्फोट करण्याच्या या धमकीच्या मेसेजमुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस सतर्क झाले आहे. हा मेसेज नेमका कोणी पाठवला त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.