जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचार्यांच्या हलगर्जीमुळे नवजात शिशूंची अदलाबदल झाली होती. त्यामुळे पालक निश्चितीसाठी डीएनए चाचणीचा निर्णय झाला. सात दिवसांनंतर दोन्ही नवजात शिशूंसह त्यांच्या मातांचे रक्तनमुने डीएनए चाचणीसाठी नाशिक येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्याचा अहवाल येण्यासाठी १५ ते २० दिवस लागण्याची शक्यता असल्याने तोपर्यंत माता बाळांपासून दुरावलेल्याच राहणार आहेत.जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सुवर्णा सोनवणे (२०, टहाकळी, भुसावळ) आणि प्रतिभा भिल (२०, कासमपुरास, पाचोरा) या प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. दोघींची प्रकृती अत्यवस्थ असल्याने दोन मे रोजी त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, नवजात शिशूंबद्दल परिचारिकेकडून निरोप देताना चूक झाली. दोन्ही कुुटुंबांकडून नवजात शिशूंविषयी दावे-प्रतिदावे केले जात होते. त्यामुळे नवजात शिशूंच्या डीएनए चाचणीचा निर्णय झाला.
डीएनए चाचणीसाठी नवजात शिशूंसह त्यांच्या मातांचे रक्त नमुने घेण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा संच हवा होता. त्याअनुषंगाने जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनी पत्र दिल्यानंतर नाशिकहून पाच दिवसांनंतर संच प्राप्त झाले. संच उशीरा प्राप्त होण्यास सुट्ट्यांचे कारण देण्यात आले. चार संच प्राप्त होताच प्रक्रिया पूर्ण करीत उपनिरीक्षक गणेश देशमुख यांच्यासह कर्मचार्यांच्या उपस्थितीत दोन्ही नवजात शिशूंसह मातांचे रक्तनमुने घेण्यात आले. ते सीलबंद करून कर्मचार्यांसोबत नाशिकच्या न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल येण्यासाठी १५ ते २० दिवस लागण्याची शक्यता असल्याने तोपर्यंत माता बाळांपासून दुरावलेल्याच राहणार आहेत. दरम्यान, पालकच निश्चित न झाल्यामुळे सात दिवसांपासून अतिदक्षता विभागातील त्या नवजात शिशूंना आईचे दूध मिळालेले नाही. त्यांना डब्यातील दूध दिले जात असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.