देर्दे (ता.दापोली) तील ग्रामस्थांचा "पाणी अडवा पाणी जिरवा" चा संदेश


सुर्यकांत बडबे खेड प्रतिनिधी

दापोली : तालुक्यातील देर्दे येथील ग्रामस्थांनी भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेऊन पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या नदी मार्गावर गाव सहभागातून बंधारा बांधून "पाणी अडवा पाणी जिरवा" चा संदेश दिला आहे.

            ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हि आजच्या काळात खूप महत्वाची गरज आहे. सध्याच्या काळात पिण्याचे पाणी खूपच कमी-कमी होत चाले आहे, याचे कारण म्हणजे सध्या होत असलेली झाडांची बेसुमार कत्तल आणि वाढते ग्लोबल वार्मिंग या सर्व गोष्टींचा आपल्या पर्यावरणावर घातक परिणाम होत आहे. त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा हि संकल्पना राबवणे खूप महत्वाचे आहे. या जाणिवेतून देर्दे ग्रामसेवा मंडळ ग्रामीण, मुंबई व श्री सातमाई देवी महिला मंडळ यांच्या माध्यमातून गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन नदी मार्गावर बंधारा बांधला आहे.

          पिण्याच्या पाण्याप्रमाणेच शेतीसाठीही आपल्याला पाण्याची गरज आहे. पिण्यासाठी आपण कितीही विहिरी खोदल्या वा कितीही पाण्याचे पंप बसवले तरी ते सर्वच निरुपयोगी ठरणार आहे. दिवसेंदिवस जमिनीखालील पाण्याची पातळी खालावत जात आहे. ही पातळी कशी वाढेल हे प्रथम पाहिले पाहिजे. त्यासाठी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या सारख्या योजना तातडीने घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड करणे. झाडे आपल्या मुळांद्वारे जमिनीखालील पाण्याचे झरे धरून ठेवतात. झाडांची संख्या वाढली तर जमिनीखालील पाण्याची पातळी वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. तसेच पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना युद्धपातळीवर राबवायला हवी. यासाठी शासन दरबारी सुद्धा प्रयत्न होणे गरजेचे आहे. यामुळेही जमिनीखालील पाण्याची पातळी वाढेल. यातूनच झरे, विहिरी, नद्या यांचे पाणी आटणार नाही. पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल आणि यातून निश्चितच पाणी टंचाईवर मात करता येईल.