शेतकऱ्यांना महाडीबीटी मधून ट्रॅक्टर सह आदी जवळपास 86 शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी फक्त 6 दिवस शिल्लक, नंतर 3 महिने करावी लागणार प्रतीक्षा


प्रतिनिधी, सदाशिव काकडे

लातूर : शासकीय योजनांचा महाडीबीटी मधून (mahadbt Farmer Scheme) लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरू आहे. यामध्ये ट्रॅक्टर पासून अनेक शेती यंत्रे व विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे. यासाठी अर्ज करायचा असेल तर केवळ 6 दिवस शिल्लक असून नंतर शेतकऱ्यांना यांसाठी 3 महिने प्रतिक्षा करावी लागणार आहे.

         शासनाने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. परंतु याची माहिती सामान्य शेतकऱ्यांपर्यंत तातडीने पोचत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळत नाही. सध्या ट्रॅक्टर, रोटाव्हेटर,कल्टीवेटर, मळणी यंत्र, पेरणी यंत्र, पाइप लाइन, ठिबक, तुषार सिंचन, शेततळे, प्लास्टिक, रोपवाटिका,फुल शेती आदि जवळपास 86 योजनांसाठी  महाडीबीटी (mahadbt Farmer Scheme) अंतर्गत शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारले जात आहेत. यासाठी 15 मे 2023 हा शेवटचा दिवस आहे. यानंतर तब्बल 3 महिने पुन्हा सोडत निघणार नाही. हा शेवटचा दिनांक पहाता शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी केवळ 6 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. याबाबत सोशल मीडियावर एक पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ते पत्र खरं असून, 15 तारखे नंतर शेतकरी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 3 महिने प्रतिक्षा करावी लागणार हे सत्य असल्याची माहिती कृषी पर्यवेक्षक यांनी दैनिक कर्णधार प्रतिनिधींशी बोलताना दिली.