अनिकेत मशिदकर मालेगाव प्रतिनिधी
13 मे नाशिक : राज्याच्या शिक्षण विभागाने महापालिका हद्दीतील चार शाळा कायमस्वरूपी बंद करण्याच्या सूचना देऊनही त्या बंद न केल्याने आता महापालिका शिक्षण विभागाकडून अंतिम नोटीस बजावताना ४८ तासांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीमध्ये शाळा बंद न केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी दिल्या.
फेब्रुवारी २०२३ मध्ये राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली. ६७४ शाळांच्या यादीमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील चार शाळांचा समावेश आहे. या चार शाळांमध्ये जेल रोड येथील एमराल्ड हाईट पब्लिक स्कूल, सातपूर येथील वंशराजे हिंदी मीडियम, वडाळा येथील खैरूल बनात इंग्लिश मीडियम स्कूल व कॅनडा कॉर्नर येथील पाटील लेनमधील महात्मा गांधी विद्यामंदीर संस्थेच्या प्राथमिक शाळेचा समावेश आहे. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने शाळा अवैध ठरवल्यानंतर महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून चारही शाळांना पत्र पाठवून बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पालकांनीदेखील अशा शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, यादेखील सूचना दिल्या गेल्या.
मात्र मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापनाने कुठलीही दखल घेतली नाही. शाळादेखील सर्रास सुरू आहे. त्यामुळे महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापनासह मुख्याध्यापकांना अंतिम नोटीस बजावल्या असून ४८ तासात शाळा बंद कराव्यात.त्यानंतर ही शाळा सुरू राहिल्यास मुख्याध्यापक आणि शाळांच्या संचालकांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. शाळा बंद न केल्यास एक लाखांचा दंडदेखील केला जाणार आहे.