करजुवे-भातगाव पुलासाठी खा. विनायक राऊत आ. शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश



सुर्यकांत बडबे खेड प्रतिनिधी 

        संगमेश्वर  - करजुवे भातगाव पुलाचे प्रत्यक्षात ऑक्टोबर महिन्यात भूमिपूजन होणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. करजुवे भातगाव पुलाच्या पाहणी दौऱ्यात आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार सुभाष बने, राजेंद्र महाडिक, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष थेराडे, शंकर भुवड, सुभाष नलावडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

        संगमेश्वर करजुवे खाडीभागाला जोडणाऱ्या करजुवे भातगाव पुलासाठी खासदार विनायक राऊत आणि आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्यामुळे बजेटमध्ये २५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. खासदार विनायक राऊत आणि आमदार शेखर निकम यांनी करजुवे भातगाव पुलासाठी जागेची शुक्रवारी पहाणी केली. यावेळी बांधकाम विभागाचे अभियंता नाईक आणि भारती रणदिवे उपस्थित होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, भातगाव पुलाच्या निधीसाठी मंजुरी देण्यात आली होती. मात्र आमदार शेखर निकम यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर ही स्थगिती उठविण्यात आली आहे.  ऑक्टोबर महिन्यामध्ये या पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आपण येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

        भातगावातील ग्रामस्थांच्या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न करणार असून याबाबत लवकरच प्रस्ताव बनवून तो सादर करणार असल्याचे  खासदार विनायक राऊत यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार शेखर निकम म्हणाले की, खरेतर खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या प्रयत्नामुळे या पुलाच्या निधीसाठी मंजुरी मिळालेली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. तसेच विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष थेराडे, राजेंद्र महाडिक यांनी आपली मते व्यक्त केली.  खासदार विनायक राऊत यांचा व आमदार शेखर निकम यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

    येथील खाडीमुळे गुहागर तालुक्यात येणारे भातगाव तर संगमेश्वर तालुक्यात येणारे करजुवे गाव हाकेच्या अंतरावर असूनही दूर होती. मात्र आता या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाचे स्वप्न साकार झाल्यास दोन गावेच नाही तर दोन तालुके जोडले जाणार आहेत.