नाशिक : आज (दि. ५ एप्रिल) दुपारी शहरातील जुन्या नाशिकमधील म्हसरुळ टेक वस्तीत आग लागण्याची घटना घडली. आज दुपारच्या सुमाराच्या लागलेल्या आगीत चार घरे जळून भस्मसात झाली आहे.
आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास नाशिक शहरातील जुने नाशिक भागातील म्हसरुळ टेक परिसरात ही घटना घडली आहे.या आगीत काही जुन्या घरांनी पेट घेतला आणि क्षणात आगीचं रुपांतर झालं.---यात आगीत जवळपास चारही घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेत एक जण जखमी झाला. तर आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी आलेल्या एका अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याचा श्वास गुदमरल्याने अत्यवस्थ झाल्याचा प्रकार घडला. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी दाखल केल्याने अनर्थ टळला.
म्हसरुळ टेक वस्तीत राहणारी कोमल पवार ही घरात काहीतरी काम करत होती. अचानक काहीतरी जळाल्याचा वास आला. तिने ही बाब कुटुंबियांना सांगितली. लागलीच आसपासचा वीजपुरवठा देखील खंडित झाल्याने पवार कुटुंबीय बाहेर पडले. साळुंखे कुटुंबीयांनाही घरात धूर निघत असल्याचे आढळून आले. त्यांनीही घराच्या बाहेर पळ काढला.
कुंभकर्ण यांच्या घरात कारखाना असून तो बंद असल्याने ते घर बंद होते. इतर तीन घरांमध्ये मात्र कुटुंबीय राहत होते. बुधवार दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास म्हसरुळ टेक भागातील जुन्या घरांनी अचानक पेट घेतला. त्यात महेश पवार, सुरेश साळुंके, सागर पेंढारकर, कुंभकर्ण यांच्या चार घरांचं जळून नुकसान झाले. दरम्यान आग लागली, त्यावेळी घरांमध्ये दोन लहान मुले, दोन महिला आणि दोन पुरुष असे सहा जण होते. घटना वेळीच लक्षात आल्याने ते घरातून बाहेर पडल्याने अनर्थ टाळला. ते बाहेर पडतात आगीने रौद्ररुप धारण केले. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग आणखीच वाढली. अग्निशामक विभागास माहिती मिळताच अवघ्या काही वेळात बंब घटनास्थळी दाखल झाले. येथील अरुंद गल्ली आणि जुन्या वाड्यांचे वाढीव बांधकामामुळे बंब घटनास्थळी पोहोचण्यास कसरत झाली.
दोन तासानंतर आगीवर नियंत्रण
टेक वस्तीच्या आजूबाजूला वस्ती असल्याने दाटीवाटीचा परिसर आहे. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण होत होते. शेवटी घटनास्थळापासून लांब बंब उभे करुन बंबाच्या पाईपला अतिरिक्त पाईप जोडून आगेवर पाण्याचा मारा करण्यात आला. दोन तासानंतर आगेवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. अग्निशामक विभागाचे अधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करत मुख्यालय दोन, पंचवटी एक आणि के के वाघ अग्निशामक केंद्र एक असे चार बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले.