फत्तेपूरमध्ये महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञासह एकाला दीड हजाराची लाच घेताना अटक

 


 जळगाव: वीजमीटर लावून देण्यासाठी दीड हजाराची लाच स्वीकारणार्‍या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञासह खासगी व्यक्तीला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी पकडले. वरिष्ठ तंत्रज्ञ विनोद पवार (32) व कलीम तडवी (27, रा. देऊळगाव, ता. जामनेर) अशी लाचखोरांची नावे आहेत.

तक्रारदार हे तोरनाळे (ता. जामनेर) येथील मूळ रहिवासी असून, ते सध्या जळगाव येथे वास्तव्यास आहेत. तक्रारदारांना तोरनाळे (ता. जामनेर) या त्यांच्या मूळ गावी ग्रामपंचायतीच्या त्यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या बखळ जागी पत्र्याच्या शेडमध्ये वीजमीटर लावायचे होते. तक्रारदारांनी फत्तेपूर (ता. जामनेर) येथील महावितरणच्या कार्यालयात वीजमीटर मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी वरिष्ठ तंत्रज्ञ विनोद पवार व कलीम तडवी या व्यक्तीने आधार कार्ड, ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला, शंभर रुपयांचे मुद्रांक व डिमांड नोट, साहेबांचे व आमचे असे एकूण साडेतीन हजार रुपये लागतील, असे तक्रारदारांना सांगितले. त्याच वेळी डिमांड नोट भरण्यासाठी तक्रारदारांकडून दोन हजार रुपये घेतले होते.

वीजमीटर लावण्यासाठी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ विनोद पवार व कलीम तडवी या व्यक्तीने तक्रारदारांकडे उर्वरित दीड हजार रुपये लाचेची मागणी केली. यासंदर्भातील तक्रार जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्याकडे केली. त्याअनुषंगाने तक्रारीची पडताळणीसाठी पोलीस उपअधीक्षक पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास केली. फत्तेपूर येथील बुलडाणा- जामनेर रस्त्यावरील बुलडाणा अर्बन बँकेच्या शेजारील बंद दुकानाजवळ सापळा रचत वरिष्ठ तंत्रज्ञ विनोद पवार व कलीम तडवी यांना लाचेचे दीड हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी पहूर येथील पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.