येवला दि.२४ (वार्ताहर:-पंकज गायकवाड)
सध्या ग्लोबल वार्मिंग च्या समस्येने सर्वजण चिंता ग्रस्त असून वेगवेगळ्या पातळ्यांवर वैयक्तिक तसेच सार्वजनिक प्रयत्न प्रत्येक जण करत आहे.
यासाठी वनविभागाने ही आता कंबर कसली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वनविभागाने विविध धार्मिक स्थळे ,आदर्श गावे, तसेच विविध शहरांमध्ये पंचायतन वन उद्यान, बेल उद्यान, तसेच अमृत वन उद्यानाची निर्मिती करण्याचा ध्यास घेतला आहे .यासाठीचे निकष ठरवून हे उद्याने विकसित करण्यात येतील यासाठी महसूल व वन विभाग आवश्यक निधी देखील उपलब्ध करणार आहे .अधिकाधिक उद्यानांमुळे प्राण वायूची निर्मिती तसेच प्रदूषणाचा ऱ्हास होऊन वातावरणात थंडपणा तयार होणार आहे .एवढेच नाही तर सर्वच वयोगटातील नागरिकांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य ही सुधारण्यास मदत होणार आहे .अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत अमृततुल्य मानल्या जाणाऱ्या औषधी वनस्पती दुर्मिळ वनस्पती व इतर महत्त्वपूर्ण वृक्षांची लागवड करून राज्यातील ७५ शहरात अमृत वन उद्यानांची निर्मिती केली जाणार आहे .शहरी भागात स्वातंत्र्याच्या स्मृती चिरंतर ठेवण्यासाठी हे उद्यान दीपस्तंभ म्हणून भूमिका बजावेल असा त्यांच्या निर्मिती मागचा हेतू आहे .एक ते पाच हेक्टर जागेची निवड करून हे उद्यान साकारले जाणार आहे .प्रत्येक जिल्ह्यात अनुकूल असणाऱ्या तीर्थस्थळी वन उद्यान साकारले जाणार आहे ;अशी उद्याने बेल उद्यान म्हणून विकसित करून तेथे वन विभागाकडून बेल, सीता ,अशोक, रुद्राक्ष ,बोर ,पळस ,पारिजात ,पांढरा चाफा ,पांढरी कनेर ,धोत्रा ,स्वस्तिक या वृक्ष प्रजातीची लागवड करून बेल उद्यान निर्माण केले जाणार आहे .यासाठी वन किंवा शासकीय जमीन संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महामंडळाच्या उपलब्ध असलेल्या एक ते अडीच एकर क्षेत्रात हे बेल उद्यान साकारले जाईल. पुढील सात वर्षे या उद्यानाचे संरक्षण आणि देखभाल वनविभाग करणार असून त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था सेवाभावी संस्थेकडे ते हस्तांतरित केले जाणार आहे. या ठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांसाठी नैसर्गिक उंचवटे वृक्षांचे उनके प्रदक्षिणा पद फिरण्यासाठी पायवाटा देखील केल्या जाणार आहे..
"शहरात व ग्रामीण भागात उद्याने साकारण्याची ही कौतुकास्पद संकल्पना आहे यामुळे पर्यावरण संवर्धन होणारा सौंदर्यात देखील भर पडणार आहे याच्या निर्मितीसह देखभालीसाठी पर्यावरण प्रेमी म्हणून आम्ही नक्कीच योगदान देऊ सर्वच नागरिकांनी या उपक्रमात स्वतःहून भाग घेऊन निसर्गाचे पर्यायाने स्वतःचेही आरोग्य उत्तम राखले पाहिजे"
राजीव सावंत (नाशिक):-समाजसेवक व वृक्षप्रेमी