मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीचा अभेद्य असा गड राखण्यात शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना यश


दिपक देशमुख मेहकर. 

शिवसेनेच्या नेतृत्वातील भूमिपुत्र पॅनलने १८ पैकी ११ जागा जिंकून बाजार समितीवर भगवा फडकविला आहे. तर शिवसेनेला महाविकास आघाडीनेदेखील जोरदार टक्कर दिली असून, सात जागांवर धक्कादायक विजय प्राप्त केला आहे. खा. जाधव यांचे बंधू तथा माजी सभापती माधवराव जाधव यांच्या पराभवाचे वृत्त ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने सुरूवातीला ऐकीव माहितीवर चालवले होते. परंतु, माधवराव हे विजयी झाल्याने शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे.मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु, खासदार प्रतापराव जाधव व आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्या नेतृत्वात भूमिपुत्र पॅनलने बाजार समितीवर भगवा फडकविला आहे. अत्यंत अतितटीच्या झालेल्या या निवडणुकीत भूमिपुत्र पॅनलने १८ पैकी ११ जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीला सात जागांवर समाधान मानावे लागले. या बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचे अ‍ॅड. सुरेशराव वानखेडे यांच्या विजयाने आघाडीची चांगली सुरूवात झाली होती. परंतु, माजी सभापती सागर पाटील पराभूत झाल्यानंतर आघाडीचा आलेख घसरला. त्यातच माधवराव जाधव यांच्या विजयाबद्दल साशंकता व्यक्त केली जात असताना, आपल्या हक्काच्या मतदार संघातील जागा भूमिपुत्र पॅनलने जिंकत ११ जागांवर विजय प्राप्त केला.

महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे) पक्षाचे स्थानिक नेते आशीष रहाटे, काँग्रेसचे श्याम उमाळकर, लक्ष्मण घुमरे यांनी शिवसेने (शिंदे)ला जोरदार टक्कर दिली आहे. तथापि, बाजार समितीच्या मतदारसंघातील ग्रामपंचायती, सोसायट्या यावर खासदार प्रतापराव जाधव व आ. संजय रायमुलकर यांची जोरदार पकड असल्याने महाविकास आघाडीला फारसे चांगली कामगिरी करता आली नाही. अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली ही बाजार समिती राखल्याने खा. जाधव व आ. रायमुलकर यांची रणनीती यशस्वी झाली आहे.