पुणे: अल्पवयीन विद्यार्थिनीला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणी एका खासगी शिकवणीचालकाला १५ वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास अपील कालावधीत पीडित विद्यार्थिनीला देण्यात यावे, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. गोपाळ किसनराव चव्हाण (वय ३३) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
निगडी परिसरात ही घटना घडली होती. या प्रकरणी चव्हाण याच्या विरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चव्हाण भागीदारीत खासगी शिकवणी चालवत होता. त्याने अल्पवयीन विद्यार्थिनीला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. तिला विवाहाचे आमिष दाखविले होते, असे पीडित विद्यार्थिनीने फिर्यादीत म्हटले होते. या खटल्यात सरकार पक्षाकडून सरकारी वकील ॲड. सुचित्रा नरोटे यांनी बाजू मांडली.
या खटल्यात सरकार पक्षाकडून आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली होती. पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकरराव अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उत्कर्षा देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास करुन आरोपी चव्हाण याच्या विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हवालदार भोसले यांनी न्यायालयीन कामकाजासाठी सहाय केले.