सैनिकी विद्यालयात महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी


उदगीर/प्रतिनिधी

श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक विभाग प्रमुख बालाजी मुस्कावाड, विभाग प्रमुख प्रा प्रदीप कोठारे,  गणित विभागाचे विभाग प्रमुख संतोष चामले हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बालाजी मुस्कावाड आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी, ज्ञान ही एक शक्ती आहे, असे जाणले . त्यांनी महाराष्ट्रात अनेक शाळांची स्थापना केली.  जोपर्यंत देशातील प्रत्येक मूल जातीच्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाही आणि देशातील महिलांना समाजातील प्रत्येक क्षेत्रात समान हक्क मिळणार नाहीत तोपर्यंत देश आणि समाजाची खरी प्रगती होऊ शकत नाही असे विचार त्यांनी मांडले. साहित्य क्षेत्रात देखील त्यांनी अतुलनीय कामगिरी केली आहे. 

अध्यक्षिय समारोपात प्राचार्य वसंत कुलकर्णी म्हणाले, महात्मा जोतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुणे येथे काढून मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शक आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद येवरीकर यांनी केले तर आभार बालाजी कांबळे यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील महिंद्रकर, सुधीर गायकवाड, नागेश पंगू, श्रीकांत देवणीकर यांनी परिश्रम घेतले.