अनिकेत मशिदकर मालेगाव प्रतिनिधी
२९ एप्रिल मालेगाव : अनेक दिवसांपासून धुरळा उडालेल्या जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी शुक्रवार (दि. २८) रोजी किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता शांततेत मतदान झाले. पिंपळगाव बसवंत, घोटी, देवळा, कळवण, दिंडोरी, चांदवड, येवला, नांदगाव, सिन्नर, मालेगाव, लासलगाव या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या मतदानासाठी सकाळपासून मतदारांनी गर्दी केली होती. सकाळी ८ वाजेपासून प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवार व समर्थकांनी गर्दी केली होती. मतदारांना मतदानासाठी आणण्यासाठी तीनही पॅनलकडून धावपळ केली जात असल्याचे चित्र होते. नांदगाव बाजार समितीची मतमोजणी रविवार (दि. ३०) रोजी होणार आहे तर मनमाड बाजार समितीसाठी ३० रोजी मतदान आणि १ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
मालेगावी किरकोळ वाद
मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी शुक्रवारी (दि. २८) रोजी किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण ४२१७ मतदारांपैकी ४११९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी चार वाजेपर्यंत ९७.६८ टक्के मतदान झाले आहे.
आज (दि. २९) रोजी शनिवारी नामपूर रोडवरील साई सेलिब्रेशन सभागृहात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पालकमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजप पुरस्कृत आपल पॅनल व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी पुरस्कृत कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या पॅनलमध्ये चुरशीची सरळ लढत झाली. शुक्रवारी तालुक्यातील सौंदाणे, निमगाव, झोडगे या तीन ग्रामीण मतदान केंद्रांवर तसेच शहरातील ल. रा. काबरा महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. सकाळी आठ वाजेपासूनच मतदानाला सुरुवात झाली होती. कडाक्याच्या उन्हात मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदारांमध्ये दिवसभर उत्साह दिसून आला. मतदान केंद्राच्या बाहेर उमेदवारांनी हजेरी लावत मतदारांना साकडे घालताना दिसून आले. किरकोळ वाद वगळता दिवसभर मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नितीन कुमार देवरे व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चार मतदान केंद्रांवर १२ बूथद्वारे मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.