उंची नसतानाही तरुण पोलिसात भरती. जिद्द आणि मेहनतीने एक तपानंतर यशाला गवसनी



प्रविण चौरे ओझर प्रतिनिधी 


ओझर :- मनात जिद्द आणि मेहनत घेण्याची इच्छाशक्ती असेल तर कुठलेही काम अशक्य नसते. तब्बल १२ वर्ष पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकाचे स्वप्न अखेर सत्यात उतरले आहे पोलीस शिपाई पदाला आवश्यक असणारी शारीरिक उंची भरत नसतानाही येथील युवकाने मेहनतीने मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई होण्याचा मान पटकवला आहे.

नुकत्याच झालेल्या पोलीस भरती मध्ये येथील अनिस  असलम शेख,या तरुणाची मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई पदासाठी निवड होताच त्याच्या सहित त्याचे कुटूंबातील सदस्य व मित्र परिवाराने एकच जल्लोष केला. अनिस चे वडील हे टायर पंक्चर चे दुकान चालवतात, आई गृहिणी आहे तर त्याचा मोठा भाऊ तौसिफ हा देखील २००९ पासून मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे.अनिस ने पोलीस भरती साठी मोठे कष्ट घेतले आहेत .सन २०११ मध्ये पहिली भरती केली त्यावेळी शारीरिक उंची कमी भरल्याने अनिस पोलीस भरतीत अपात्र ठरला.मात्र इतर मुलांप्रमाणे हार न मानता तब्बल दोन वर्ष मेहनत घेऊन सायकलिंग, दोर उडी असे विविध व्यायाम प्रकार करत उंची वाढवण्यात यशस्वी झाला हे विशेष.उंची वाढल्याने आशेचा किरण दिसला.मेहनत घेऊन उंची वाढवल्याने २०१३ साली झालेल्या भरती साठी तो पात्र ठरला परंतु लेखी परीक्षेत अपयश आले. अनिस ने सलग २०१३ ते २०२० पर्यत पोलीस भरती केली पण अवघ्या दोन तीन गुणांनी यश हुलकावणी देत होते अखेर २०२० साली वयोमर्यादा संपली व पुन्हा नजरेसमोर काळोख तयार झाला. परंतु कोरोना आजाराने जसे अनेकांचे नुकसान केले तसे ते काहींना फायदेशीर ही ठरले यात शासनाने दोन वर्ष भरती न होऊ शकल्याने वयोमर्यादा वाढवून दिली व अनिस ला एक वाढीव संधी मिळाली. अशातच मनोमन विचार केला कि अभी नहीं तो कभी नहीं असे म्हणून त्याने पुन्हा एकदा भरतीची तयारी सुरु केली व आज त्याचे फळ त्याला मिळाले जवळपास एक तप त्याने भरतीसाठी लढा देत संघर्ष करून तो यशस्वी ठरला.

       दरम्यान घरात आपला हातभार लागावा यासाठी येथील हिंदुस्थान ऐरोनोटिक्स लिमिटेड (एच.ए.एल. )कंपनीत अनिस २०११ पासून कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होता त्यातून वेळ मिळेल तसा मैदानी आणि लेखीचा सराव चालू ठेवला व यशाला गवसनी घातली.इतर विद्यार्थ्यांनीही अनिस कडून प्रेरणा घेऊन आपले शंभर टक्के योगदान दिल्यास यशस्वी होता येते ही जिद्द मनाशी बाळगून प्रयत्न करायला हवेत.अनिस चे ओझर च्या नागरिकांनी तसेच सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी,ज्ञानेश्वरी अभ्यासिकेतील सहकारी मित्रांनी व निफाड भाजपा विधानसभा प्रमुख यतीन कदम यांनीही शुभेच्छा देत कौतुक केले.

 मला मिळालेलं हे यश अनेकांनी मला दिलेल्या मार्गदर्शनाने व माझ्या आई वडिलांच्या व कुटुंबा तील सदस्यांच्या आशीर्वादाने प्राप्त झाले आहे मी त्यांच्या कायमच ऋणात राहू इच्छितो. माझे शालेय व महाविद्यालयीन शिक्षक व माझे सहकारी मित्रांनी दिलेल्या पाठबळा मुळे मला हे यश प्राप्त करता आले. माझ्या सारख्याच तयारी करणाऱ्या इतर मुलांना पण मी तयारीत सातत्य व जिद्दी ने मेहनत करण्याचा सल्ला देईल. आपण स्वतःच स्वतःचे प्रेरणादायी व्हा हेच मी नेहमी सांगेल. अनिस शेख, मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई.ओझर