प्रतिनिधी अनिकेत मशिदकर (मालेगाव)
"आत्मफुले" कवितासंग्रह
कवयित्री : सौ. राजश्री निरज बोहरा
परीक्षण - श्री राम नेमाडे (सुप्रसिद्ध साहित्यिक)
एका कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला आल्या असताना सौ. राजश्री यांनी मला त्यांचा " आत्मफुले " हा कवितासंग्रह भेटस्वरूप दिला व अपेक्षा व्यक्त केली की मी माझा अभिप्राय कळवावा. त्यांच्या आग्रहावरून मी त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ' ५ वे सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन ' या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून हजेरी लावली. राजश्री ह्या पेशाने शिक्षिका असून पिण्डाने साहित्यिका आहेत.
" आत्मफुले " कवितासंग्रह वाचायला घेतला तेव्हा त्याच्या मनोगतात त्यांनी लिहिलेलं ' काव्यलेखन ही खरोखरच एक प्रतिभा आहे ' हे वाक्य मला आवडलं. प्रतिभेला कल्पनेचे पंख फुटले की काव्य आपसूक झरू लागते. या कविता संग्रहाला योगिनी गाडे वाघमारे (सुप्रसिद्ध साहित्यिक) यांची सटिक प्रस्तावना लाभली आहे. कवयित्रीच्या काव्यलेखनासंदर्भात त्यांनी एक सुंदर विधान केले आहे - ' नवपरिणीत वधूने जसा शृंगाराचा साज चढवावा तसा कवयित्रीच्या शब्दकळांनी काव्यरचनेत तो चढविला आहे.' ही कवयित्रीला मिळालेली प्रशस्ती म्हणावी लागेल.
" आत्मफुले " कविता संग्रहात एकूण ६१ कवितांचा समावेश आहे. यात नातेसंबंध, निसर्ग, प्रेमभावना ओल, सामाजिक जाण, प्रासंगिक प्रश्न अशा नानाविध विषयावर कविता लेखन केले आहे. कवितांची बहुसंख्य शीर्षके एकशब्दी आहेत. काही दोन शब्दी तर अत्यल्प तीनशब्दी व एखाद चार शब्दी. कवयित्री अध्यात्मवादी असल्याने ' आले तुझ्या चरणी ' या
गुरूभक्तीविषयक पहिल्याच कवितेत त्या म्हणतात
' तूच पाठीराखा माझा तूच माझा भगवंत
तुझ्या पदरी झिजून जावा तुच्छ देह ही हा माझा '
कविता संग्रहाचे शीर्षक संग्रहातील एखाद्या कवितेचे शीर्षक
म्हणून स्वीकारण्याचा बहुतेकांचा कल असतो. कवयित्रीने संग्रहातील दुसरी कविता--' आत्मफुले ' ला पसंती देऊन तेच शीर्षक पसंत केले असावे. त्या लिहितात---
' स्वत्व माझे शोधताना मी मला नवखी कळे
ठाव घेता अंतरीचा जुळली ही आत्मफुले...'
' भास्कर ' तिला तमाचा हर्ता, पालनकर्ता व जीवाचा त्राता
वाटतो.' रजनीकांता ' या कवितेत ती म्हणते--'
तू अविरत असाच सोबत रहा
तेजस्वी शुभ्र चांदण्याची गरज आहे ' तर
' शशिकांत ' या गीतात अलविर शब्दांत ती लिहिते--
' तिमिरास हरे गगनास छेदूनी रात
रसिक हा प्रियकराचा नाथ '
कवयित्रीचे ग्रहताऱ्यावल प्रेम यांतून स्पष्टपणे जाणवते.
' बाबा ' व ' आई ' ही सर्वात जवळची जिव्हाळ्याची नाती !
बाबा जगण्याची उमेद व लढण्याचे बळ देतात तर आई
' संकटातूनबाहेर पडण्यास शक्ती देते. ' आईपण ' हा अनुभव
प्रत्येक स्त्रीसाठी अनमोल उपहार आहे. मूल जन्माला आल्यावर आईला होणारा आनंद खरे तर शब्दांत मांणणे कठीण. हा क्षण टिपताताना कवयित्री लिहिते---
' किलकिल्या डोळ्यांनी पाहिलेस तू मला
आईपण हे दाटून आले दुग्धधारेतून उरा '
,' प्रीत ', ' प्रेमलता ' कवितांतून प्रेम उर्मी, स्पर्श, उन्माद आदींच्या स्मृती चाळविणाऱ्या कविता आहेत.
' घेशील का?' हा प्रेयसीने प्रियकराला विचारलेला लडीवाळ
प्रश्न आहे. ती त्याच्याकडून कबूली मागताना विचारते--(
' माझे मी पण हरवून गेले
तव प्रमाने बहरून आले
घेऊन हात हातात माझ्या
ओळख आपली देशील का? '
' मला ही वाटतं ',' आता मी ही होणारच ',' कैफात ' ह्या कविता प्रेम रसात ओतप्रोत भिजल्या आहेत. प्रेम मिलनाचे अनूभव त्यांत साकारले आहेत.
' मदनाची बाधा ' प्रेयसीला प्रियकराने दिलेल्या उपहारातून, प्रियकराच्या स्पर्शातून, त्याच्या आलिंगनातून होत असते. तिचे सर्वांग मोहरून जाते.ती हा अनुभव हळुवारपणे सांगते--
' केसात माळता गजरा तू असाच सायंकाळी
मदनाची बाधा मजला, होई त्या कातरवेळी
' फुंकर ', ' अंतरीची प्रीत 'ह्या कविताही वाचनीय आहेत. रसिकांनी त्या अवश्य वाचाव्यात.
' प्रतिबिंब ' या कवितेत कवयित्रीने प्रेमाचं प्रतिबिंब कोठे कोठे व कोणत्या रूपात उमटत हे सोदाहरण सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ही एक सुंदर व कव्यगुणात्मक कविता आहे. पुढील कडव्यात प्रतिबिंब केले आहे.....
' चांदण्याची भरली होती जत्रा
सतरंगांची मैफल सजलेली
सात - सुरांची आरास मी करता
गाण्यात तुझं प्रतिबिंब उमटलं '
२
' कळत नकळत ' या कवितेत जीवनात जे काही भलेबुरे घडते ते कळत नकळतच घडत असते. पुढील ओळी बघा....
' प्रांजळ आणि हळुवारपणे
जीवनात प्रेम घडते तेही कळत नकळत ||
' गुज ' कवितेत कान्हानेच तिच्या मनाला नाद लावला. त्याच्या लीला अगाध आहेत. तो मनकवडाही आहे...
' दह्या-दुधाची रास फोडतो गोपिकांची हा छेड काढतो
गोप-सख्यासह रमून जातो खेळ खेळतो वृंदावनी ||
' मिलनाची ओढ ',' स्वप्नातल्या कळ्यांना ',' कधी वाटते ',
' स्वाधीन ' ह्या कविताही कवयित्रीच्या मनातील खूप काही सांगून जातात.' मन ' कवितेत मनाची डावाडोल अवस्था वर्णन करताना मन कधी कधी भीतीग्रस्त होते. ती म्हणते....
' पण...भीती वाटते मनाला स्वप्नभंग होण्याची
वाळूत बांधलेलं घर लाटेसरशी विरण्याची ||
' पोरका ' ही कविता अर्ध्यावाटेवर पतीला सोडून गेलेल्या पतीची भाव अवस्था सांगते व त्याला आलेले पोरकेपण
सूचित करते. तो म्हणतो.. आज पोरका जाहलो!
' तू ',' तुझी स्मृती..','प्रीती केली 'कविता प्रेमकविताच आहेत.
' ओले दिवस ' कविता विरहामुळे झालेली अवस्था सांगते.
' तुजविणा हे जीव सुने स्वप्नेही माझे ओले ओले|
' कोंदण 'मधील ह्या दोन ओळी खूप काही सांगून जातात....
' कोंदणात जपलेली जखम अजून ओली
प्रीतीच्या विषाची तरी त्यात गोडी ||
' हुंदके ' ही अंतर्वेदना व्यक्त करणारी मार्मिक कविता आहे.
' स्मृती ', ' दुःखाच्या वाटेने ' ह्या दोन कविता वाचनीय आहेत. मरणयातना ' ही कविता भौतिक जीवनाचे वास्तव्य
कथित करते. सामाजिक विवशता वाढली आहे. हे चित्र पहा..
' विसरा आता माया-ममता कपट छळाने गाजली जनता
इमानाला आग लागली बैमानांची आली सत्ता.'
' मुकीभाषा ' सामाजिक आशयाची कविता आहे. ती म्हणते..
' अवघे झाले जीर्ण-शीर्ण अन् सुन्न झाल्या दिशा
खूप सोसले आजवरी, आता झाली मुकी माझी भाषा '
' वेदना ' व ' तिमिराच्या अंती ' कवितांतून विरहाची दाहकता आणि विरहात अंती येणारी सुखाची रास हे अनुभव कथित केले आहेत. ह्या भावगीतसदृश गेय रचना आहेत.
' अजून किती काळ ' या कवितेत स्त्री जातीची अबला म्हणून
हेटाळणी होत आली आहे. कवयित्री तीव्र शब्दांत विचारते....
' नव्या जगाचे सूर्य म्हणून जन्माला आलात
सूर्याच्या तेजाने पेटून अरे काय !
मायेलाच जाळू लागलात? '
' एकट्याचे जीवन ' या कवितेत माणसाचे जगणे मरणे एकट्याचे असते, हे सांगितले आहे. येतो एकटा आणि जातोही एकटाच. नात्यागोत्याचा पसारा सारे क्षणिकच !
या संग्रहातील ' भंगलेल्या आरश्यात ' ही कविता ही हरवलेल्या माणुसकीच्या संदर्भात लाखमोलाची आहे. माणसाने भौतिक प्रगती केली खरी पण तो माणुसकीला पारखा झाला. त्या माणुसकीचा कवयित्री शोध घेते आहे.
' वेशीवरती टांगली ही नीतिमत्ता साऱ्यांनीच
मोल जीवनाचे रुजवाया प्रेमबीज शोधते मी ||
' कहर ' कवितेत' स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाला संदर्भात....
' नरभक्ष्यांच्या कातडीसाठी किती साहावा कहर हा आता..
' यलगार ' कवितेत कवयित्रीने केलेला निर्धार विचार करायला भाग पाडतो. ती निर्धारपूर्वक लिहिते....
' सुमनातूनी रुसूनी परिमळ हा वेगळाला
सुकलेल्या पाकळ्यांचे हे भस्म चोळते मी
भरलेल्या मैफिलीत या एकांत शोधते मी.. ||
' स्वप्न 'ही कविता कवयित्रीला स्वप्नांच्या नगरीत घेऊन जाते.
या स्वप्नांवर फक्त तिचाच अधिकार असतो.' जीवन म्हणजे.. '
या कवितेत कवयित्रीने जीवनाच्या विविध अंगांचीओळख करून दिली आहे. जीवन म्हणजे काय असतं? तुम्हीच पहा..
' जीवन म्हणजे ऋणानुबंध पुष्पातील मधुर सुगंध
इंद्दधनुचे सप्तरंग जीवन म्हणजे मुक्त अन् रम्य ||
' पुन्हा नव्याने ' ही कविता कवयित्रित झालेल्या वैचारिक बदलाची साक्ष पटविते. तिच्याच शब्दांत सांगायचे तर....
' सोडून सारे बुरसटलेपण विचार अंतरीचे खोलते आहे
नव्या क्षितिजाच्या शोधून वाटा मुक्त हासणे शिकते आहे ||
भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकऱ्याच्या कष्टावर देश जगतोय. बळीराजा या शब्दांत काहीतरी गफलत झालेली दिसते. हा शब्द पावसाला उद्देशून वापरला आहे की काय?
अर्थात हे कवयित्रीच सांगू शकेल. ' दे दान जराशी ' कवितेत
पावसा अभावी शिवाराची झालेली दैना, त्यात आग ओकणारा सूर्य. ' शिवारात देवा बरसात होऊ दे ' हेच मागणं!
" आत्मफुले " संग्रहातील शेवटची कविता-' चाळीशीची रांग.'
चाळीशी आली की अर्धा डाव संपला असून अर्धा डाव शिल्लक राहिल्याची जाणीव होते. थकवा येतो, विश्रांती घ्यावी असा मोह होतो पण पुढील टप्पा गाठायचा असल्याने थांबून चालणार नाही, हाही संकेत मिळतो.ती स्वतःला म्हणते.
पुन्हा नव्या जोमाने उभे रहावे म्हणते
नव्याउमेदींना थोडं रिचार्ज करू म्हणते
कवयित्री राजश्री यांचा " आत्मफुले " कविता संग्रह प्रेम कवितांचा खजिना आहे. तरूण-तरूणींना तो खूपखूप आवडेल. मोठ्याप्रमाणात त्याचे स्वागत होईल.. कवयित्रीने सामाजिक जाणिवेच्या कविता लिहाव्यात. कोषातून थोडं बाहेर पडायला हवं. भाषा व कल्पकतेचे वरदान आहेच. पुढील लेखन प्रपंचासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. शुभंभवतु.