गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरूच


अनिकेत मशिदकर मालेगाव प्रतिनिधी 

   मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नं. ४८/२०२३ राजेंद्र दत्तू गांगुर्डे राहणार वनवली, तालुका बागलाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अद्वय प्रशांत हिरे, मंजीत शिंदे, लकी रमेश खैरनार व रियाज अली खान सह या चौघांच्या विरोधात भादवि कलम ४०६,४२० व ३४ कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या लोकांनी संगणमत करून संस्थेत शिक्षकाची नोकरी लावून देण्यासाठी विश्वास संपादन करून आपल्याकडून दहा लाख रुपये घेतले मात्र आजपर्यंत नोकरी दिली नाही म्हणून आपली या लोकांनी फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

          हा गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वीच महात्मा गांधी विद्यामंदिर मध्ये पत्नीला शिक्षकाची नोकरी लागावी यासाठी नऊ लाख रुपये देऊनही नोकरी न लागल्याने आपली फसवणूक झाल्याची तक्रार सटाणा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. सचिन धोंडू अहिरराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आपली पत्नी एम. ए. बी. एड. झालेली असून तिला महात्मा गांधी मंदिरात शिक्षिकेची नोकरी मिळावी म्हणून आपण वेळोवेळी नऊ लाख रुपयांची रक्कम अपूर्व प्रशांत हिरे यांच्या सांगण्यावरून प्रदीप केदुलाल टाकिया यांना दिली. मात्र पैसे देऊनही नोकरी मिळाली नाही त्यामुळे अहिरराव यांनी सटाणा पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीनुसार अपूर्व प्रशांत हिरे व प्रदीप केदुलाल टाकिया या दोघांवर भादवि कलम ४२० व ३४ कलमांखाली फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक वर्षा जाधव गुन्ह्याचा तपास करीत आहे. अशा प्रकारचे नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरूच असून सध्या मुख्य आरोपी प्रदीप टाकिया हा सटाणा पोलिसांच्या कस्टडीत असून तपास सुरू आहे.