जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीते आज (रविवारी) जाहीर झाले. सकाळी 6 वाजता सूर्योदयावेळी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी या घट मांडणीचे निरीक्षण करून यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली. या भाकितानुसार जून महिन्यामध्ये पाऊस कमी असणार आहे, त्यामुळे पेरणीची सुरुवात उशीरा होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर जुलैमध्ये साधारण आणि ऑगस्टमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊसाचे भाकीत वर्तवण्यात आले आहे. त्यानंतर पावसाच्या चौथ्या म्हणजे सप्टेंबर महिन्यातही कमी पावसाचा अंदाज आहे
पिकांबाबत केलेल्या भाकितांमध्ये गहू, ज्वारी, तांदूळ आणि इतर पिके सर्वसाधारण स्वरूपाची असतील असे सांगण्यात आले आहे. मात्र उत्पन्न चांगलं असलं तरी अवकाळीने या पिकांना फटका बसणार असल्याचे भाकीत यंदाच्या भविष्यवाणीमध्ये वर्तवण्यात आलं आहे. याशिवाय राजकीय परिस्थितीवरही भाकीत करण्यात आले आहे. यामध्ये देशाचा राजा कायम असणार असे सांगण्यात आले आहे. एका बाजूला शेतकऱ्यांचा या घटमांडणी आणि यातील भाकितावर विश्वास असल्याच चित्र आहे.बुलढाण्यात जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठावरील भेंडवळ गावात मागील 370 वर्षांपासून घटमांडणीची परंपरा जोपासली जाते. दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर घटमांडणी केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी या घटात झालेल्या बदलावरून भविष्य वर्तविण्यात येते. यातील पाऊस आणि हवामानाच्या भाकिताकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं असतं. या भाकितावरून शेतकरी आपल्या वर्षभराच्या पीक-पाण्याचे नियोजन करत असतो.370 वर्षांच्या या परंपरेला आता पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज पुढे नेत आहेत. पाऊस, पिकाचा अंदाज सांगणाऱ्या भेंडवड येथील प्रसिद्ध घट मांडणीमध्ये आज घट मांडण्यात आले आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अठरा विविध प्रकारचे धान्याचा गोलाकार पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. याच्या मधोमध एक खड्डा करून त्यामध्ये घागर ठेवण्यात आली आहे.